ङजु ने ते सारेच सोने’ किंवा ‘जुने जाऊ द्या मरणालागून’ हे दोन्ही विचार टोकाचे आणि वास्तविकता नाकारणारे आहेत. दोन्ही गोष्टींमध्ये काही बरे आणि काही वाईट आहे. आधुनिक विज्ञानाने मानवी जीवन अधिक सुकर आणि सुलभ केले असले तरी त्याचे दुष्परिणामही आता समोर आले आहेत. त्याचप्रमाणे कालबाह्य़ ठरविले गेलेले आपल्याकडच्या परंपरागत शास्त्रांचे निष्कर्षही आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. भारतीय परंपरेतील आयुर्वेद हे असेच पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित राहिलेले शास्त्र. आता जगानेही आयुर्वेदीय चिकित्सा आणि उपाय मान्य केले असले तरी ६०-६५ वर्षांपूर्वी तशी परिस्थिती नव्हती. तत्कालीन आधुनिक भारतीय समाज पश्चिमेकडील नवलाईच्या प्रेमात होता. त्या काळात आयुर्वेद किंवा परंपरागत वनौषधींच्या आधारे बनविलेले एखादे उत्पादन तयार करणे आणि लोकांनी ते वापरावे यासाठी प्रयत्न करणे हे अगदीच प्रवाहाविरुद्ध पोहणे होते. मात्र केशव विष्णू पेंढरकर यांनी ते धाडस केले. वडिलांच्या नावे त्यांनी विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून दातांच्या हिरडय़ा मजबूत करण्यास पोषक ठरणाऱ्या वनौषधींपासून दंतमंजन तयार केले. सारे जग आधुनिक रसायनांच्या प्रेमात असताना केशव पेंढरकर मात्र परंपरागत रसज्ञानावर विश्वास ठेवून होते. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ‘विको वज्रदंती’ची लोकप्रियता त्यातील उपयुक्त घटकांमुळे कायम राहिली, असे म्हणावे लागेल. सुरुवातीची काही वर्षे दंतमंजन तयार करण्याचा पेंढरकरांचा हा उद्योग घरगुती स्वरूपाचा होता. पुढे मागणी वाढत गेल्याने १९६५ मध्ये डोंबिवली औद्योगिक विभागात ‘विको लॅबोरेटरीज’ या कंपनीची स्थापना करण्यात आली. आपल्या या व्यवसायाची धुरा पुढील पिढीने समर्थपणे पेलावी म्हणून त्यांनी मुलगा गजानन याला फार्मसीचे शिक्षण दिले. गजानन पेंढरकर यांनी वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. ‘विको’चे पारंपरिक आयुर्वेदिक दंतमंजन त्यांनी पेस्ट स्वरूपातही बाजारात आणले. हळद आणि चंदनाचा वापर करून बनविलेले सौंदर्यप्रसाधन (टर्मरिक क्रीम) हे त्यांचे पुढचे पाऊल होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा