कोपरी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या गावदेवी यात्रे निमित्ताने ६ जानेवारीला ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. त्यामुळे बाराबंगला, ठाणेकरवाडी, कोपरी चौक परिसरात वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे. कोपरी येथील स्थानक परिसरातील कोपरी काॅलनी भागात ६ जानेवारीला गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने चिखलादेवी- गावदेवी यात्रेचे आयोजन केले जाणार आहे.
हेही वाचा >>> कल्याण: पत्रीपूल ते पलावा चौकादरम्यान दुतर्फा वाहने उभी न करण्याचे आदेश ; कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचा पथदर्शी प्रकल्प
ठाण्यातील विविध भागातून या यात्रेत भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ६ जानेवारीला सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत ठाणे वाहतूक पोलिसांनी परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यानुसार, कोपरी चौक, सिध्दार्थनगर मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना आणि खासगी बसगाड्यांना कोपरी चौक येथे प्रवेश बंद असेल.
येथील वाहने कोपरी चौकातून पुन्हा मागे फिरुन जातील. तसेच कोपरी चौक, सिध्दार्थनगर येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणारी हलकी वाहने, ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या टीएमटी बसगाड्या, बेस्ट आणि एनएमएमटी बसगाड्यांना हसिजा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. परिवहन सेवेच्या बसगाड्या हसिजा चौक येथून उजवीकडे वळण घेवून इच्छित स्थळी जातील. तर हलकी वाहने कोपरी चौक येथून उजवीकडे वळण घेवून बारा बंगला, ठाणेकरवाडी, कन्हैयानगर, पारशीवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.