कल्याण – राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुका शांततेत, वाहतुकीच्या अडथळ्याविना पार पडाव्यात यासाठी वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यासह कल्याणमधील अंतर्गत रस्ते सोमवारी (ता.१४) दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे रस्ते बंद राहणार असले तरी वाहन चालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कल्याण शहरात शिळफाटा, अंबरनाथ, बदलापूरकडून येणारी जड, अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे रामचंद्र मोहिते यांनी बंद, पर्यायी रस्ते मार्गाचे नियोजन केले आहे.
शिळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा येथून (दत्तमंदिर)येथून कल्याण, डोंबिवली शहराकडे येणाऱ्या जड, अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मुंब्रा बाह्यवळण रस्ता, खारेगाव, मुंबई नाशिक महामार्गाने पुढे जातील. नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गाने रांजणोली वळण रस्ता दुर्गाडी किल्ला येथून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना दुर्गाडी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सोमवारी रात्री १२ वाजल्यानंतर इच्छित स्थळी सोडण्यात येणार आहेत.
कर्जत, बदलापूर, अंबरनाथ भागातून कल्याण शहरात येणाऱ्या जड, अवजड वाहनांना काटई-बदलापूर रस्त्यावरील नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण भागातून कल्याण शहराकडे येणाऱ्या जड, अवजड वाहनांना खोणी येथील निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने बदलापूर, अंबरनाथ, काटई-बदलापूर चौक, लोढा पलावा-कल्याण फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
कल्याण पूर्व भाग बंद
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील ड प्रभाग कार्यालय येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डाॅ. आंबेडकर जयंतीचा उत्सव आणि मिरवणुका याठिकाणी येणार आहेत. सुमारे १५ हजार अनुयायी या उत्सवात सहभागी होणार आहेत. यासाठी उल्हासनगर भागातून कल्याण पूर्व कोळसेवाडी भागाकडे येणाऱ्या जड, अवजड, खासगी, एस. टी. बस यांना श्रीराम चौक येथे प्रवेश करण्यात येणार आहे. कल्याण पश्चिम, उल्हासनगर भागातून कल्याण पूर्वेत येणाऱ्या सर्व जड वाहनांना सम्राट चौक वालधुनी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मलंग रस्ता, चक्कीनाका भागातून विठ्ठलवाडी, उल्हासनगरकडे जाणाऱ्या जड वाहनांना चक्कीनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
कल्याणमधील डाॅ. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका शांततेने पार पाडण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा. बंद केलेल्या रस्ते मार्गातून येण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.- सचिन सांडभोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक विभाग.