लोकसत्त खास प्रतिनिधी
कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील स्मार्ट सिटी प्रकल्पातून उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलावर १४ तुळया ठेवण्याचे काम पालिकेकडून रात्री एक ते पहाटे पाच वेळेत केले जाणार आहे. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
आणखी वाचा-डोंबिवली गणेशनगर मधील संथगती रस्ते कामामुळे वाहन कोंडी
वलीपीर रस्ता भागात उड्डाण पुलाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या रस्त्यावरील पुलावर तुळ्या ठेवण्याचे काम केले जाणार आहे. या कामात अडथळा नको म्हणून या रस्त्यावरून रात्रीच्या वेळेत होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पत्रीपुलाकडून वलीपीर रस्त्याने कल्याण रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने या १० दिवसाच्या कालावधीत गुरूदेव हॉटेलकडून स्थानकाकडे जातील. रेल्वे स्थानकाकडील वाहने गुरूदेव हॉटेलकडून पत्रीपूल किंवा शिवाजी चौक दिशेने जातील, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.
दिवसा वाहतुकीला अडथळा नको आणि रेल्वे स्थानक भागात कोंडी नको म्हणून ही कामे रात्रीच्या वेळेत घेण्यात आली आहेत, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.