लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गाजवळील खारेगाव भागात भुयारी गटार योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून विविध कामे केली जात आहेत. या कामांसाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव आणि साकेत पूल परिसरात मोठे वाहतुक बदल केले आहे. ३१ मे पर्यंत हे वाहतुक बदल कायम असतील.
खारेगाव भागात ठाणे महापालिकेच्या वतीने भुयारी गटार योजना टप्पा दोन अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे खारेगाव येथून मुंबई नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली असून मोठे वाहतुक बदल या भागात करण्यात आले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरून खारेगाव वळण रस्त्यावरून खारेगावच्या दिशेने वाहतुक करण्यास बंदी आहे. येथील वाहने गॅमन रोड, पारसिकनगर मार्गे किंवा नवीन कळवा पूलावरून वाहतुक करतील.
आणखी वाचा-कल्याण जवळील नेवाळी गावातील किराणा दुकानात सापडले साडेचार कोटींचे अमली पदार्थ
खारेगाव येथील वळण रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वळण रस्त्याजवळ प्रवेशबंदी आहे. येथील वाहने ६० फूट मार्ग, दलवाडी, जुना पुणे-मुंबई मार्ग, कळवा नाका मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल ३१ मे पर्यंत कायम असतील.