लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये एफसी बार्सिलोना आणि रियल मॅड्रीट लीजेंट्स या दोन फुटबॉल क्लबमधील माजी खेळाडूंमध्ये रविवारी (६ एप्रिल) सामन्याचे आयोजन केले आहे. हा सामना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी अवजड वाहनांना शहरात बंदी घातली आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी नवी मुंबईत जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वाहतुक बदल लागू केले आहे.

नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये व्होका स्पोर्टस प्रा.लि. च्या वतीने एफसी बार्सिलोना आणि रियल मॅड्रीट लीजेंट्स या दोन फुटबॉल क्लबमधील माजी खेळाडूंमध्ये रविवारी फुटबॉल सामन्याचे आयोजन केले आहे. या कालावधीत नवी मुंबई पोलिसांनी सर्व जड अवजड वाहनांना दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत मनाई केली आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी नवी मुंबईत जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी प्रवेशबंदी लागू केली आहे. मुंबई, वसई, विरार येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना फाऊंटन हॉटेल येथे प्रवेश बंदी असेल. तसेच बाळकूम, साकेत, कळवा पूल येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना कळवा नाका, घोडबंदरहून ठण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गायमुख येथे प्रवेशबंदी असेल.

खारीगाव टोलनाका, पारसिक चौक, मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईत जाणाऱ्या अवजड वाहनांना पारसिक चौक येथे प्रवेशबंदी असेल. पनवेल येथून कल्याणफाटा, शिळफाटा मार्गे महापेच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना शिळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. भिवंडी येथून जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना रांजनोली येथे आणि सोनाळे गाव येथून नाशिक मार्गे जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना बासुरी हॉटेलजवळ प्रवेशबंदी असेल.

गुजरात येथून ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी येथे प्रवेशबंदी असेल. बापगाव येथून जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना गांधारी नाका येथे प्रवेशबंदी असेल. कल्याण येथून जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व अवजड वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेशबंदी असेल. तर बदलापूर,अंबरनाथ येथून बदलापूर जलवाहिनी मार्गे तसेच काटई बदलापूर चौक येथून तळोजा बाह्यवळण मार्गे जाणाऱ्या अवजड वाहनांना खोणी निसर्ग नाका येथे प्रवेशबंदी असेल. हे वाहतुक बदल रविवारी दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू असतील.