प्रवाशांच्या सोयीनुसार पुढील बदल वाहतुकीत करण्यात आले आहेत
ठाणे : दिवाळी निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बाजारपेठ, कोर्टनाका, स्थानक परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. २६ ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी २ ते रात्री ११ वाजता पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. येत्या काही दिवसांत दिवाळी असल्याने नागरिक खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात बाहेर पडत आहेत. मागील शनिवारी आणि रविवारी या सुट्ट्यांच्या दिवशी वाहतूक बदल लागू नसल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागला होता. त्यामुळे आजपासून ठाणे पोलिसांनी शहरातील बाजारपेठ, कोर्टनाका, स्थानक परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल
– जांभळी नाका येथून बाजारपेठेच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने कोर्टनाका येथुन जांभळीनाका येथे उजवीकडे वळण घेवून टॉवरनाका मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
– खारकर आळी येथून बाजारपेठ, जांभळी नाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना महाजनवाडी येथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने खारकर आळी येथून ठाणे महापालिका व्यायाम शाळा, एन.के.टी. महाविद्यालय, कोर्ट नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
– ठाणे ट्रेडर्स दुकान येथून जांभळी नाका येथे येणाऱ्या दुचाकी वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. ही वाहने ठाणे ट्रेडर्स दुकान येथून महागिरी मशीदकडे वळुन इच्छीत स्थळी जातील.
– दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथून बाजारपेठच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्टेडीयमजवळ प्रवेशबंद करण्यात येत आहे. येथील वाहने अग्निशमन कार्यालय येथुन राघोबा शंकर रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
– अशोक सिनेमा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक दुकान येथून बाजारपेठेत वाहतूक करणाऱ्या दुचाकी वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना अॅटीटयूड दुकाना जवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे. वाहने नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स दुकान येथुन उजवीकडे वळून दत्त मंदिर सिडको थांबा येथून इच्छित स्थळी जातील.