ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्ताने ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि भिवंडी शहरात शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गांवर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.ठाणे शहरातील साकेत, कळवा, विटावा येथून सिडको किंवा स्थानक परिसराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कळवा खाडी पुल तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कोर्टनाका, बाजारपेठ, जांभळीनाका मार्गे वाहतुक करतील. चरई, जिल्हा शासकीय रुग्णालय येथून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना महापालिका शाळेजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळीनाका, बाजारपेठ मार्गे वाहतुक करतील. ठाणे रेल्वे स्थानक येथून सॅटीस पुल मार्गे मासुंदा तलावाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या टीएमटी आणि राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांना गोखले रोड मार्गे वाहतुक करावी लागेल. तर स्थानक परिसरातून रिक्षा तसेच इतर हलक्या वाहने मुस रोडमार्गे वाहतुक करतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोखले रोड येथून राम मारूती रोडने मासुंदा तलावाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गजानन महाराज चौक, दगडी शाळा मार्गे वाहतुक करतील. अल्मेडा चौक, राम मारूती रोड येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना पु.ना. गाडगीळ चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने राम मारूती रोड, गोखले रोड मार्गे वाहतुक करतील. चरई, गडकरी चौक येथून वाहतुक करणाऱ्या वाहनांना दरबार उपाहारगृहाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने सेंट जाॅन शाळा, मालतीबाई चिटणीस रुग्णालय, चिंतामणी चौक किंवा टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील. गडकरी चौकातून चिंतामणी चौक आणि मुस चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशबंदी असेल. टाॅवरनाका, गडकरी रंगायतन, बोटींग क्लब पर्यंत मासुंदा तलावाच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास प्रवेशबंदी असेल. तसेच ठाणे महापालिका भवन ते अल्मेडा चौक, ओपन हाऊस, आराधना चौक, भक्ती मंदीर येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी असेल. हे वाहतुक बदल दुपारी २ ते मिरवणुका संपेपर्यंत लागू असतील.

हेही वाचा >>>कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ

कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील, डोंबिवलीतील माणकोली पुलावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. सहजानंद चौक, आधारवाडी चौक, उर्दू हायस्कूल, दुर्गामाता चौक, लालचौकी भागातील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे. भिवंडी कोन भागातून दुर्गाडी पुलावरून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने वाडेघर चौक, आधारवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील. शिळफाटा, पत्रीपूलकडून येणारी सर्व हलकी वाहने गोविंदवाडी वळण रस्त्याने दुर्गाडी पुलावरून इच्छित स्थळी जातील.दुर्गाडी किल्ल्याजवळ दुर्गा माता चौकात विसर्जन मिरवणुकांमुळे वाहन कोंडी झाल्यास सर्व वाहने गांधारी पूल मार्गे येवई नाका येथून पडघा नाका येथे सोडण्यात येतील. कल्याण शहरातील वाहने येवई नाक्याकडून इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे. राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्या, खासगी बसगाड्यांना दुर्गाडी ते शिवाजी चौक मार्गे वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. भिवंडी येथून वाहतुक करणाऱ्या बसगाड्या गोविंदवाडी वळण रस्त्याने वल्लीपीर रस्ता येथून शहरात येतील. मुरबाड रस्त्याने येणाऱ्या बसगाड्या बिर्ला महाविद्यालय, दुर्गाडी, गोविंदवाडी वळण रस्ता येथून कल्याणमध्ये येतील. या बस गाड्यांना प्रेम ऑटो येथे प्रवेश बंद केला आहे. विसर्जनामुळे माणकोली पूल मंगळवारी दुपारी १२ ते गणपती विसर्जन होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे शहरांमधून अंजूरदिवे, माणकोली, लोढाधाम येथून येणाऱ्या वाहनांना माणकोली गाव येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने भिवंडी वळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. डोंबिवली शहरातून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना कोपर उड्डाण पूल, ठाकुर्ली उड्डाण पूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in thane kalyan bhiwandi on the occasion of anant chaturdashi amy