ठाणे : देवी मुर्ती आगमन मिरवणूकी निमित्ताने कोर्टनाका परिसरात रविवारी ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत. या वाहतुक बदलामुळे ठाणे रेल्वे स्थानक, कोर्टनाका परिसरात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.

आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन केले जाते. रविवारी मासुंदा तलाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये देवी मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे यावेळी कळवा ते मासुंदा तलाव अशी मिरवणूक काढली जाणार आहे. या कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.

जीपीओ कोर्टनाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना जीपीओ येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह, क्रिकनाका मार्गे, दादोजी कोंडदेव स्टेडिअम मार्गे वाहतुक करतील. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून टाॅवर नाका, टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या बसगाड्या, रिक्षा, चारचाकी वाहनांना डाॅ. मूस चौक येथे प्रवेशबंदी असेल. ठाणे स्थानक परिसरातून सुटणाऱ्या बसगाड्या गोखले रोड, नौपाडा मार्गे वाहतुक करतील. तर रिक्षा आणि चार चाकी वाहने डाॅ. मूस रोड चौक येथून डावे वळण घेऊन वाहतुक करतील.

कळवा क्रिकनाका मार्गे कोर्टनाक्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृह येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्गे वाहतुक करतील. कोर्टनाका ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पथ, अग्यारी परिसर, मासुंदा तलाव परिसराच्या दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल. हे वाहतुक बदल दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळेत लागू असतील.