ठाणे : मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या दुरुस्ती कामासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केले आहेत. २६ ते २९ एप्रिल या कालावधीत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आल्याने या मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदर ते गुजरात अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहतूक घोडबंदर मार्गेे दुपार आणि रात्रीच्या वेळेत होते. या वाहनांची संख्या मोठी आहे. याशिवाय, घोडबंदर भागात राहणाऱ्या नागरिकांची वाहनेही याच मार्गावरून वाहतूक करतात. यामुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होते. त्यातच मेट्रो प्रकल्प, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत वाढ झाली आहे. या मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत आणि वाहतूक कोंडी होते. या मार्गावरील गायमुख भागातील रस्ता हा डोंगरातून जातो. हा रस्ता डांबरी आहे. या घाटातील डांबरी रस्ता गेल्या काही वर्षांपासून उखडत असून गेल्यावर्षी पावसाळ्यापुर्वी दुरुस्त करण्यात आलेला हा रस्ता पाऊस सुरू होताच उखडला होता. यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीत वाढ झाली होती. यंदा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापुर्वी नादुरुस्त झालेल्या गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सीजीबीएम पद्धतीने रस्ते बांधणी

गायमुख घाट परिसरात सिमेंट ग्राउटेड बिटुमिनस मिक्स (सीजीबीएम) या पद्धतीने रस्त्याचे काम केले जाणार आहे. या पद्धतीनुसार याठिकाणी डांबरी रस्ता तयार केला जाणार आहे. त्यानंतर त्यावर केमिकल मिश्रीत काँक्रीटचा थर टाकला जाणार आहे. पावसाळ्यात डांबरी रस्ता उखडू नये यासाठी पाचशे मीटरच्या रस्त्याची सीजीबीएम पद्धतीने रस्ते बांधणी केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, या पद्धतीचे रस्ते टिकणार की नाही, हे येत्या पावसाळ्यातच स्पष्ट होईल.
कोंडी टाळण्यासाठी वाहतूक बदल

गायमुख घाट रस्ता दुरुस्ती कामासाठी २६ ते २९ एप्रिल या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार, मुंबई, ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना वाय जंक्शन आणि कापुरबावडी येथून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने वाय जंक्शन येथून सरळ नाशिक रस्त्याने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. तसेच कापुरबावडी येथून कशेळी, अंजुरफाटामार्गेही वाहने जातील. मुंब्रा आणि कळव्याकडून घोडबंदर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने मानकोली, अंजुरफाटामार्गे जातील. गुजरातकडून घोडबंदर रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना फाऊटन हाॅटेलजवळ प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गुजरात, मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरच्या दिशेने येणारी वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुरफाटा, माणकोली, भिवंडी मार्गे जातील, अशी माहीती वाहतूक पोलिसांनी दिली.

सातत्याने वाहतूक बदल

घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील खांब, गर्डर आणि स्थानक उभारणीच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच माजिवाडा भागातील मेट्रो स्थानक उभारणीच्या कामासाठी माजिवाडा उड्डाणपुल रात्रीच्यावेळेत वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. हे वाहतूक बदल पुर्ववत झाले असून त्यानंतर आता गायमुख रस्ते कामासाठी वाहतूक बदल लागू होणार आहेत.