कल्याण : रक्षाबंधन आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारून सोमवारी कार्यक्रम करण्याचे निश्चित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी चौक वाहन कोंडीने कार्यक्रम नसताना दररोज गजबजलेला असतो. अशा परिस्थितीत या चौकात सोमवारी मंडप उभारून कार्यक्रम ठेवला तर कल्याण शहर वाहन कोंडीने जाम होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
आमदार विश्ननाथ भोईर यांना डामडौलात रक्षाबंधन उत्सव आणि लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम करायचा असेल तर त्यांनी फडके, सुभाष मैदानात किंवा अत्रे रंगमंदिरात कार्यक्रम घेण्याची मागणी कल्याण मधील नागरिक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक, दुकानदारांकडून केली जात आहे. यापूर्वी शिवाजी चौकात निवडणूक प्रचाराची कार्यालये थाटली जायची. त्यावेळीही दिवस, रात्र शिवाजी चौक वाहन कोंडीने गजबजलेला असायचा. शिवाजी चौकात मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याची मागणी करणारे पत्र शिंदे गट शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याणच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांना पाठविले आहे.
हेही वाचा…जुनी डोंबिवलीत वाढदिवसासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण
शिवाजी चौकात मंडप उभारणीसाठी परवानगी दिली तर हे काम रविवारी सुरू होईल. सोमवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत शिवाजी चौकातील मंडपामुळे वाहन कोंडीला सुरुवात होईल. शिळफाटा मार्गे येणारी वाहने, कल्याण शहरांतर्गतची वाहने मंडपामुळे अडकून राहण्याची शक्यता असल्याने कल्याण शहर ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी वाहन कोंडीत अडकून रक्षाबंधनासाठी बाहेर पडलेले भाऊ या कोंडीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस, वाहतूक विभागातील अधिकारी खासगीत शिवाजी चौकातील मंडपासाठी अनुकूल नाहीत. पण, सरकार पक्षाचा कार्यक्रम, त्यात खासदार डॉ. शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवाजी चौकात मंडप उभारणीसाठी परवानगी नाकारली तर राजकीय नाराजीला सामोरे जाण्याची भीती असल्याने परवानगी देणारे पोलीस, वाहतूक विभागातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत. शिवाजी चौकातील दररोजची वाहन कोंडी, या ठिकाणी काही आंदोलन, मोर्चा निघाला तर शिवाजी चौक कसा वाहन कोंडीत अडकून पडतो. प्रवाशांची कशी हैराणी होते, याची जाणीव असल्याने कल्याणच्या गोपनीय शाखेने मात्र शिवाजी चौकात शिवसेनेला मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यास विरोध केला असल्याची माहिती एका विश्वसनीय सुत्राने दिली. बारा फूट लांबीची राखी बहिणी मुख्यमंत्र्यांना बांधतात, असा कार्यक्रम याठिकाणी होणार आहे.
हेही वाचा…दीड लाखाहून अधिकची रक्कम असलेली डोंबिवलीतील प्रवाशाची लोकलमध्ये विसरलेली पिशवी परत
शिवाजी चौकात मंडप असला तरी तेथे वाहन कोंडी होणार नाही अशी व्यवस्था असेल. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या कार्यक्रमाला दुपारी चार वाजता येतील. त्यानंतर मुख्य कार्यक्रम होईल.– विश्वनाथ भोईर आमदार, कल्याण पश्चिम
आपल्यापर्यंत हा विषय आला नाही. स्थानिक पोलीस ठाणे पातळीवर हा परवानगीचा विषय मार्गी लावला जातो. -कल्याणजी घेटे, साहाय्यक पोलीस आयुक्त,
कल्याण.