ठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील जिल्हा म्हणून ठाणे शहर आणि त्यालगतच्या भागात अनेकजण वास्तव्यास आले. यामध्ये उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांपासून ते राजकीय पक्षातील नेतेमंडळींचा सामावेश आहे. परंतु हाच ठाणे जिल्हा आता वाहतुक कोंडीचे आगार ठरू लागले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरु असलेली सुरु असलेली रस्ते दुरुस्ती आणि मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे, रस्त्यामध्ये बंद पडणारी जड-अवजड वाहने, खड्डे आणि वाहतुक बदल यामुळे होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर, शिळफाटा, मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, ठाणे -बेलापूर, मुंबई आग्रा रोड, पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडीचा सामना करताना नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. शाळांच्या बसगाड्या वाहतुक कोंडीत अडकत आहे. इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करुन घरे घेणाऱ्या ठाणेकरांना आता कर्जत-कसाऱ्यातील नागरिकांना रेल्वे प्रवासाने जितका वेळ लागतो. तितकाच वेळ लागत आहे. ठाणे स्थानकाहून घोडबंदर आणि कर्जतला पोहचण्यासाठी लागणारा वेळ जवळपास सारखाच झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहन कोंडीने प्रवासी हैराण

ठाणे जिल्हा हा मुंबई उपनगराला लागून आहे. मुंबईच्या तुलनेत थोड्या कमी किमतीमध्ये जिल्ह्यात घरे मिळत असल्याने ठाणे शहरातील घोडबंदर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळण, महापे-शीळरोड, घोडबंदर,ठाणे- बेलापूर हे महत्त्वाचे मार्ग जातात. तसेच अंतर्गत मार्गांचे जाळेही मोठे आहे. ठाणे जिल्ह्यात पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर आणि जुना आग्रा रोड मार्गावरील भिवंडी भागात मेट्रोची कामे सुरू आहेत. तर मुंबई नाशिक महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुरुस्ती आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. शिळफाटा येथे नाल्यामधील पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग रोखल्याने पावसाळ्यात शिळफाट्यातील रस्त्यावर पाणी साचत आहे. या सर्व त्रासामुळे ठाणेकर हैराण झाले असून दररोज वाहतुक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

कल्याण भिवंडी येथून मुंबई नाशिक महामार्गे ठाणे, मुंबई गाठताना प्रवाशांची तारांबळ होत आहे. ठाणे बेलापूर मार्गे प्रवास करताना कळवा, विटावा भागात अरुंद रस्त्यामुळे कोंडी होते. त्यातच ठराविक कालावधी वगळता प्रवेशबंदी असताना ठाण्यात अवजड वाहनांचा प्रवेश होऊ लागला आहे. ही वाहने भर रस्त्यात बंद पडू लागली आहेत. अरुंद रस्त्यांमुळे एखाद्या रस्त्यावर वाहन बंद पडल्यास त्याचा परिणाम जिल्ह्यातील वाहतुक व्यवस्थेवर होतो. शुक्रवारी घोडबंदर येथील आनंद नगर भागात अवजड वाहन बंद पडल्याने संपूर्ण घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. वाहतुक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकल्याची स्थिती आहे.

हेही वाचा…घोडबंदर मार्ग ठप्प, अपघातामुळे कोंडी

मुंबईहून रात्री घरी परतणारा नोकरदार पूर्व द्रुतगती महामार्गे कोपरी रेल्वे पूलावरून ठाणे शहरात प्रवेश करतो. परंतू या मार्गावरही कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शन पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे नोकरदारांना कोपरी ते कॅडबरी जंक्शन असा प्रवास करण्यासाठी किमान पाऊण तास लागतो. हे अंतर कोंडी नसल्यास अवघे १५ मिनिटांचे आहे. त्यातच या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही अत्यंत वाईट झालेली आहे. या रस्त्यांवर देखील वाहतुक कोंडी होत असून नागरिक हैराण झाले आहेत. वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांचा इंधन खर्च वाढत आहे. वेळेचा देखील अपव्यय होत आहे. ठाणे ते कर्जत-कसारा या मार्गावर प्रवासासाठी प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागतात. तर ठाणे ते कासारवडवली हे अंतर गाठण्यासाठी देखील प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागत आहे. त्यामुळे ठाण्यात वास्तव्य करून उपयोग काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

ठाणे शहरात दररोजच्या कोंडीमुळे इंधन खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वाहतुक कोंडीत अडकावे लागत असल्याने कामाच्या वेळांमध्येही बदल झाला आहे. कामावर जाण्यासाठी ठराविक वेळेआधीच घर सोडावे लागते. – जयेश गवारे, प्रवासी

ठाणे शहरात वाहतुक कोंडी सोडविण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असतात. खड्डे भरणी किंवा इतर प्राधिकरणाची कामे सुरू असल्यास त्यांनी ती तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले जाते. – डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा

हेही वाचा…नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार

-घोडबंदर येथे सप्टेंबर २०२१ मध्ये तेलाचा कंटेनर वाहनांवर धडकले होते. त्यामुळे रस्त्यावर तेल सांडल्याने घोडबंदर, मुंबई – नाशिक महामार्गावर १८ तास कोंडी झाली होती.

-डिसेंबर २०२२ मध्ये टँकर उलटल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्गाची वाहतुक ७ तास ठप्प झाली होती.

-मुंबई नाशिक महामार्गावर एप्रिल २०२३ मध्ये नितीन कंपनी येथे ट्रक बंद पडला होता. त्यामुळे नितीन कंपनी आणि ऐरोली पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic chaos in thane ongoing construction and heavy vehicles cause daily jams psg
Show comments