आच्छाड येथे वाहनांची तपासणी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आच्छाड पोलीस चौकी येथे वाहतूक अडथळे टाकून नाकाबंदी करण्यात आली आहे. चारचाकी व अवजड वाहने अडवून कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. मात्र या प्रक्रियेस बराच वेळ लागत असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी पोलीस ठाण्यांतर्गत आच्छाड या ठिकाणी शनिवारी सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत गुजरातकडून मुंबईच्या दिशेने नाकाबंदी करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ही नाकाबंदी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मोठय़ा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.

महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असते. शिवाय हा महामार्ग देशातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा असल्याने खासगी वाहनांची वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर असते. मात्र येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी संध्याकाळी नाकाबंदीमुळे वाहनांची तब्बल तीन किलोमीटर रांग लागली होती, अशी माहिती अडकलेल्या वाहनचालकांनी दिली. या वाहतूक कोंडीमध्ये अनेकदा रुग्णवाहिकाही अडकल्याचे दिसून येत आहे.

प्रवासी वेठीस

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून नाकाबंदी करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता नाकाबंदीदरम्यान संशयास्पद आढळणाऱ्या  वाहनांची व व्यक्तींची चौकशी केली जाते. प्रसंगी वाहन जप्तही केले जाते. परंतु हे करत असताना वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करणे गरजेचे आहे. परंतु या नियमाला फाटा देत महामार्गावर तीन लेनपैकी दोन लेनवर वाहतूक अडथळे टाकून प्रवाशांना जाण्यासाठी फक्त एक लेन शिल्लक ठेवून वेठीस धरले जात आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

शनिवारी संध्याकाळी ४ ते ८ या कालावधीत नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीदरम्यान थोडीफार वाहतूक कोंडी होत असते. परंतु शनिवारी जास्त वाहतूक कोंडी झाली होती, तरी आम्ही यापुढे अधिक काळजी घेऊ.   -अजित वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी