डोंबिवली– डोंबिवली पश्चिमेत सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले रस्ता, सुभाष रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा गांधी रस्त्यांवर संध्याकाळच्या वेळेत दुतर्फा विविध वस्तू, खाऊच्या हातगाड्या लावण्यात येतात. या रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून दररोेज वाहन कोंडी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वाहन कोंडीचा सर्वाधिक त्रास कामावरुन घरी परतणाऱ्या नोकरदारांना सर्वाधिक होत आहे. स्थानिक मंडळींना हाताशी धरुन काही परप्रांतीय रस्त्यावर हातगाड्या लावण्याची कामे करत आहेत. होणारी मिळकत पन्नास टक्के वाटून घेतली जाते, असे काही रहिवाशांनी सांगितले. हातगाडी चालकांना बाजुचा बंगला, इमारतीमधून वीज पुरवठा केला जातो. संबंधिताला दरमहा वीज वापराचे भाडे दिले जाते.

हेही वाचा >>> डोंबिवलीत बुवाबाजीच्या नावाने पादचाऱ्याची ९० हजाराची फसवणूक

पालिकेच्या इतिहासात फेरीवाल्यांना हटविण्याची महत्वाची कामगिरी डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाने पार पाडली आहे. मागील सात वर्षापासून डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला बसणार नाही याचे काटेकोर नियोजन ह प्रभागाने केले आहे. त्याची कठोर अंमलबजावणी केली जाते. रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करणाऱ्या ह प्रभागाने आता अंतर्गत भागातील रस्ते, चौकांमध्ये बसणाऱ्या फेरीवाल, टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.

महात्मा फुले रस्त्यावर श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्त्यावर दुतर्फा हातगाड्या लावण्यात येतात. या रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. हा रस्ता दररोज संध्याकाळी वाहन कोंडीने गजबजून जातो. अष्टगंध सोसायटी, प्रकाश प्रीतम संकुलासमोरील मासळी विक्रेते, हातगाडीवाले पदपथ, रस्त्यावर बसतात. या भागातून एखादे वाहन जात असेल तर रस्ता पूर्ण बंद होतो. अशीच परिस्थिती इतर रस्त्यांवर आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’; आनंद परांजपे यांची अटक व सुटका

ह प्रभागाने अंतर्गत रस्त्यांवर, चौकात वाहतुकीला अडथळा येईल अशा पध्दतीने हातगाड्या, टपऱ्या लावणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.

“ह प्रभाग हद्दीतील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांना अडथळा येईल अशा पध्दतीने कोणी हातगाड्या, टपऱ्या लावून व्यवसाय करत असेल, त्यांच्यावर उद्यापासून कारवाई सुरू करण्यात येईल. ही कारवाई नियमित सुरू ठेवण्यात येईल. व्यावसायिकांनी नुकसान होण्यापूर्वी स्वताहून हातगाड्या काढून घ्याव्यात.” सुहास गुप्ते साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion due to hand cart on busy roads in dombivli zws
Show comments