ठाणे आणि घोडबंदर भागात मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामामुळे महामार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत असल्यामुळे कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी केली जात असल्यामुळे कोंडी भर पडत आहे. वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती मात्र, या करवाईचे फारसे अधिकार नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याने ही कारवाई थंडावली आहे तर, वाहतूक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे सेवा रस्ते बेकायदा पार्किंगच्या विळख्यात अडकल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा- ठाणे खाडीत फ्लेमिंगोची लगबग; ७० हजार ते १ लाख फ्लेमिंगोचे आगमन
ठाणे तसेच घोडबंदर भागात मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामामुळे महामार्गांवरिल मार्गिका वाहतुकीसाठी कमी झाल्या असून यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी नागरिक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचा वापर करीत आहेत. परंतु या रस्त्यावर बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. शिवाय याठिकाणी गॅरेज, जुनी व नवीन वाहन खरेदी व विक्रीची दुकाने असून हे सर्वजण वाहने सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी करतात. या वाहनांची संख्याही जास्त असते. याशिवाय हॉटेल तसेच इतर आस्थापनाही सेवा रस्त्यांवर वाहने उभी करतात. सेवा रस्त्यांच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहत नाही. या निमुळत्या मार्गामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी सेवा रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना बेकायदा वाहन पार्किंगचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. महामार्ग आणि सेवा रस्ते अशा दुहेरी कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हेही वाचा- ठाणे : अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यास अटक
या कोंडीची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधित सहायक आयुक्तांना सेवा रस्त्यावरील बेकायदा वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पालिका पथकाकडून अशी वाहने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. परंतु कारवाईचे फारसे अधिकार नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तसेच ही कारवाई काही दिवसांत थंडावली. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. मात्र, त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्यामुळे बेकायदा पार्किंगमुळे सेवा रस्त्यांवर होणाऱ्या कोंडीचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.
ठाण्यातील सेवा रस्त्यांवर होणारी बेकायदा पार्किंग हटविण्याची कारवाई सातत्याने सुरू आहे. आमचे पथक ठाणे वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करीत आहोत. त्यानंतर पार्किंग होत असेल तर कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.