रस्तेकामाच्या सोहळ्याचा वाहतुकीला फटका; मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे ते वडपेदरम्यानच्या रस्त्याच्या आठपदरीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाने गुरुवारी महामार्ग अडवून धरला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मोठय़ा संख्येने उपस्थित असलेले राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी वाट मोकळी करून देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या हा महामार्ग दीड ते दोन तास कोंडीत सापडला.
महामार्गावरील ठाणे ते वडपे अशा २० किमी अंतराच्या रस्त्याचे आठपदरीकरण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा भिवंडीतील दिवे अंजूर गावातील पुरुषोत्तम पाटील क्रीडानगरी येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. दुपारी काय्र्रक्रम संपल्यानंतर नेत्यांची आणि उपस्थित नागरिकांची वाहने एकाच वेळी मैदानातून बाहेर पडली. महामार्गालगतच हा कार्यक्रम असल्यामुळे तेथील वाहनांना वाट मोकळी करून देण्यासाठी महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आणि त्यात अनेक प्रवासी अडकून पडले. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.
दिवे अंजूरपासून ते माजिवाडय़ापर्यंत तर नाशिक -मुंबई मार्गिकेवर दिवे अंजूरपासून रांजनोली नाक्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. या कोंडीबाबत अनेकांनी समाजमाध्यमांवरून टीकेचा सूर लावत नाराजी व्यक्त केली. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा भार ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील अंतर्गत रस्त्यांवरही आला. दीड तासानंतर वाहतूक पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.
कोंडीस कारण की..
ठाणे तसेच भिवंडी शहरातून दुपार १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी दिली जाते. गुरुवारी दुपारी १२ वाजता जेएनपीटी बंदरातील अवजड वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर येण्यास सुरुवात झाली. काही वाहने मुंब्रा बाह्य़वळण -खारेगाव मार्गे तर काही वाहने ऐरोली आनंदनगरमार्गे मुंबई-नाशिक महामार्गावर आली. या वाहनांचा भार वाढत असतानाच भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांना वाट मोकळी करून देण्यासाठी दिवे अंजूर गावाजवळ वाहने रोखून धरण्यात आली. त्यात खारेगाव भागात दोन ट्रक बंद पडल्याने या कोंडी