कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील राधानगर भागातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या सततच्या वाहन कोंडीमुळे या भागातील रहिवासी, परिसरातील शाळांमध्ये येणारी विद्यार्थी, पालक, रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण, नातेवाईक हैराण आहेत. या कोंडीवर प्रभावी उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याणच्या वाहतूक विभागाकडे केली आहे.

कल्याणमधील खडकपाडा भागातील राधानगर हा नव्याने विकसित झालेला भाग आहे. या भागात तीन मोठी रुग्णालये, शाळा, नृत्यालय, बाजारपेठ आहे. या भागात वाहनतळाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीसाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, रुग्णांना रुग्णालयात पाहण्यासाठी जातात. दरम्यानच्या काळात या रस्त्यावरून मोठे अवजड वाहन आले तर या रस्त्यावर कोंडी होते. या कोंडीत रुग्णवाहिका, शाळेच्या बस, प्रवासी नागरिक अडकून पडतात.

हे ही वाचा…ठाणे : वाहतुकीचे नियमन करताना पोलिसांचाच जीव धोक्यात, सुमारे महिन्याभरात पाच पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

दररोज या भागात वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे या भागात नव्याने राहण्यास आलेले स्थानिक रहिवासी हैराण आहेत. त्यांना आपल्या सोसायटीतून आपले वाहन बाहेर काढताना रस्त्यावरील वाहनांचा अडथळा पार करून जावे लागते. बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिक बाजारातील रस्त्यावर रिकामी जागा असेल तेथे वाहने उभी करतात. या वाहने उभी करण्यावरून अनेक वेळा खरेदीदार, व्यापारी, रहिवासी यांच्या वाद होत आहेत. वाहतूक पोलिसांची या भागात गस्त नसल्याने वाहन चालक बेशिस्तीने या भागातून वाहने चालवितात. या भागात कशाही पध्दतीने वाहने उभी करतात. या सर्व तक्रारी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप सरचिटणीस साधना गायकर यांनी कल्याण वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. खडकपाडा राधानगर भागातील रस्त्यांवर सम, विषम तारखे प्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्याची सुविधा वाहतूक विभागाने निर्माण करून दिली, तसेच या भागातून दररोज टोईंग वाहन फिरवले तर रस्त्यावर बेशिस्तीने वाहने उभी करण्याच्या प्रकाराला बऱ्याच प्रमाणात आळा बसेल, अशी सूचना माजी आमदार पवार यांनी वाहतूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

हे ही वाचा…Porn Star Riya Barde Arrested: बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!

खडकपाडा भागातील भाजपच्या सरचिटणीस साधना गायकर यांच्याकडेही स्थानिक व्यापारी, रहिवाशांनी राधानगर भागातील वाहन कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदने दिली आहेत. राधानगरमधील वाहन कोंडीचा प्रश्न गंभीर झाल्याने माजी आमदार पवार, सरचिटणीस गायकर यांच्या पुढाकाराने कल्याणच्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांबरोबर व्यापारी, रहिवासी यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत राधानगर, खडकपाडा भागातील वाहन कोंडीचा प्रश्न, येथील वाहनतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीला माजी परिवहन सदस्य स्वप्निल काटे, सुनील चव्हाण, प्रवीण देशपांडे, पल्लवी खंडागळे, उमेश झुंजारराव, सुभाष वाणी, सुमित शाह, श्रीकांत शेळके, सच्चिदानंद दुबे, राजेस लिंबाचिया उपस्थित होते.