दिवाळीच्या तोंडावर ठाण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर कपडे विक्री; पालिकेचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहराच्या विविध भागांत रस्ता अडवून भरवल्या जाणाऱ्या बेकायदा बाजारांचा दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर कहर झाला आहे. गावदेवी आणि राममारुती रस्ता या रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या आणि कोंडीने ग्रासलेल्या रस्त्यांवर शनिवार-रविवारी मुंबईतील फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोडप्रमाणे कपडे विक्रेते ठाण मांडू लागले आहेत. सण जवळ आल्यामुळे त्यांच्याकडून स्वस्तात कपडे खरेदी करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. देवदयानगर, शास्त्रीनगर नाक्याजवळही बेकायदा आठवडा बाजार सुरू आहेत. कारवाई केली जात नसल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

महापालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले होते. शहरात एकही आठवडा बाजार भरू दिला जाणार नाही, अशी घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली होती. अनेक राजकीय नेत्यांनीही आवाज उठवला होता, मात्र आता रस्त्यांवर फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करीत आहेत. जांभळीनाक्यावर भाजी मंडईच्या बाहेर ठाणे परिवहन सेवेचा बसथांबा आहे. तो अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे प्रशासन गेली कित्येक वर्षे डोळे झाक करीत आहे. सायंकाळी कोर्टनाका परिसरातून येणाऱ्या बसही येथे थांबतात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.

गावदेवीतील गाळ्यांमध्ये फॅशन ट्रेण्डनुसार स्वस्तात कपडे मिळतात. त्यामुळे ग्राहकांची तिथे गर्दी असते. आता शनिवार, रविवारी रस्त्याच्या दुतर्फा  कपडे विक्रेत्यांची गर्दी होऊ लागली आहे. देवदयानगर, शास्त्रीनगर नाक्याजवळ आठवडा बाजार भरतात. त्यामुळे मोठी कोंडी होते. रविवारी बाजाराच्या दिवशी एका मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात येत असल्याने प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

रिक्षा थांब्याला वेढा

वागळे इस्टेट येथील सावरकरनगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर या परिसरात जाण्यासाठी नागरिकांना गावदेवीतून शेअर रिक्षांचा पर्याय आहे. या भागात रिक्षामुळे अर्धा रस्ता व्यापलेला असतानाच रिक्षाथांब्याजवळ उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांमुळे या बाजारातून वाट काढणे प्रवाशांसाठी कठीण होऊ लागले आहे. जांभळीनाका परिसरात सायंकाळी या गर्दीमुळे रिक्षाचालक भाडेही स्वीकारीत नसल्याचे प्रवासी जान्हवी शिंदे यांनी सांगितले. काही ग्राहक याच बाजाराच्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion in thane
Show comments