|| ऋषीकेश मुळे / नीलेश पानमंद
ठाण्यात प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी; २० मिनिटांच्या प्रवासाला पाऊण तास
अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे सदैव गजबजलेल्या घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे या मार्गावरून प्रवास करणे अक्षरश कठीण झाले आहे. या कोंडीने वाहनचालकांचा मेटाकुटीस आणले असतानाच आता या कोंडीचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही दिसू लागला आहे. घोडबंदर मार्गावरील पाच मिनिटांच्या अंतरासाठी जवळपास एक तास मोजावा लागत असताना मुख्य ठाणे शहरातही दहा ते ते बारा किमीचे अंतर कापण्यासाठी तासभर खर्ची घालावा लागत आहे.
ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी मार्गरोधक बसिवण्यात आले आहेत. या मार्गरोधकांमुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडू लागला असून गर्दीच्या वेळेस या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. घोडबंदरमधील अंतर्गत रस्ते खोदल्यामुळे या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे घोडबंदरवासीयांचा प्रवासच कोंडीमय झाला आहे. ठाणे शहरातही अशीच काहीशी अवस्था आहे. ठाणे स्थानक आणि आसपासच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत प्रचंड वाहतूक कोंडी होते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्याच्या घोषणेपलीकडे फारसे काहीच होताना दिसून येत नाही.
मुख्य मार्गावरील कोंडीची ठिकाणे
- घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कापूरबावडी परिसर, बाळकुम नाका, तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नल परिसर, पातलीपाडा, आनंद नगर, कासारवडली तसेच महामार्गालगतचे सेवा रस्ते या भागात मोठय़ा प्रमाणावर कोंडी होते.
- ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी उड्डाणपूल, आनंदनगर पथकर नाका, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी, माजिवाडा उड्डाण पुलाच्या पायथ्याशी तसेच मार्गालगतचे सेवा रस्ते या भागांत कोंडी होते.
- कळवा भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे-बेलापूर मार्गावरही विटावा ते कळवा चौकापर्यंत दिवसभर वाहतूक कोंडी असते.
खासगी वाहतूकही खर्चीक
ठाणे तसेच घोडबंदरमधील विविध भागांतून ठाणे स्थानकापर्यंत जाण्यासाठी टीएमटीच्या बसगाडय़ा, रिक्षांची व्यवस्था आहे. मात्र, ही वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्यामुळे अनेक जण आता स्वत:च्या दुचाकीने प्रवास करणे पसंत करीत आहेत. परंतु हा पर्याय आता त्यांना महाग पडू लागला आहे. दुचाकीच्या प्रवासातही वाहतूक कोंडीचे अडथळे निर्माण होत असल्याने त्यांच्या इंधन खर्चात वाढ झाली आहे. महिन्याला तीनशे ते चारशे रुपयांनी इंधन खर्च वाढल्याचे चालकांकडून सांगण्यात आले.
शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्या तुलनेत मात्र अरुंद रस्ते, पर्यायी मार्ग उपलब्ध नसणे, वाहनतळाची पुरेशी सुविधा नसणे आणि गृहसंकुलात वाहनतळाची पुरेशी सुविधा नसल्याने तेथील वाहने रस्त्यावर उभी करणे, या कारणास्तव वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात ३५ हजारांहून अधिक रिक्षा रस्त्यांवर धावत असून त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. शहरातील बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून त्याचबरोबर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतुकीच्या नियोजनासाठी शंभर वाहतूक सेवक पुरवण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. – अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस विभाग
शहरातील अंतर्गत कोंडीची ठिकाणे
कामगार नाका, गोखले मार्ग, महात्मा गांधी मार्ग, सिडको बस स्थानक, टेंभी नाका, खोपट बस स्थानक परिसर, मीनाताई ठाकरे चौक, मुख्य बाजार, तलावपाळी, गावदेवी, मल्हार सिनेमागृहासमोरील रस्ता, हरिनिवास, ओपन हाऊस, सावरकरनगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, साठेनगर, कोलशेत, कळवा नाका, साकेत, कळवा, मुंब्रा आणि शीळफाटा