मेट्रो प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या कामामुळे महामार्ग आक्रसणार; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजना अपुऱ्या
वडाळा ते कासारवडवलीदरम्यान होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे ठाणे आणि घोडबंदरमधील मुख्य रस्ते अरुंद झाले असतानाच आता कापूरबावडी येथेही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ माती परीक्षणाच्या कामासाठी महामार्गावरील सहा मीटर रुंद पट्टा संपादित केला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या उपायांवर काम सुरू केले असले तरी ठाणे, मुंबई आणि नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहने यामुळे अडकून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कापूरबावडी सिग्नल जवळ मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने माती परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सहा मीटरचा रुंद मार्ग संपादित केला जाणार आहे. ही जागा दिल्यास ठाणे, मुंबई आणि नाशिकहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड अडथळा निर्माण होणार आहे. आधीच या मार्गावर अडथळे बसविल्याने कोंडी निर्माण झाली आहे. असे असताना माती परीक्षणाच्या कामासाठी पुढेही जर अडथळे बसविले तर याचा फटका वाहतुकीला बसणार आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता या नव्या कामांमुळे जर कोंडी झाली तर, प्रवास करायचा की नाही हा प्रश्न पडला आहे, असे राजेंद्र पगारे या प्रवाशाने सांगितले.
सध्याची परिस्थिती
- मेट्रो प्रकल्पाच्या खोदकामासाठी एमएमआरडीएने महामार्गावर अडथळे उभे केले आहेत. त्यामुळे दररोज रात्री ठाण्याहून घोडबंदरकडे जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.
- महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांखालील जलवाहिन्या बाजूला करण्याचे कामही तीन टप्प्यांत करण्यात येणार असून त्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हे काम सुरू झाल्यानंतर कोंडीत भर पडणार आहे.
- मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असताना महापालिकेने घोडबंदर सेवा रस्ताही मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवला आहे. यामुळे या भागातील कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.
एमएमआरडीएकडून कापूरबावडी पेट्रोल पंपाच्या पुढे माती परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी त्यांना जागा हवी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार होत नाही तोवर एमएमआरडीएने हे काम पुढे ढकलावे अशा सूचना दिल्या आहेत. – आर.आर. सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी वाहतूक शाखा.