लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: शहरात कोणत्याही प्रकारच्या नियोजनाविनाच एकाच वेळेस अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. तसेच या कामांच्या मुद्द्यावरून त्यांनी पालिकेच्या कारभारावर आगपाखड केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून पालिकेने रस्ते दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. एकाच वेळी अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणेकर वाहतूक कोंडीने हैराण झाले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमातून पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

हेही वाचा… कल्याणमध्ये वाडेघरमधील तरुणाला टोळीकडून ठार मारण्याचा प्रयत्न

संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन केले आहे, असे काही दिसून येत नाही. हजारो कोटींचे रस्ते होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण, या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत. १ जून ते १ ऑक्टोबर कामे करता येत नाहीत. तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करत हे हजारो कोटी जे ठाण्याच्या विकासासाठी आणले आहेत, ते पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणारे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… शहापूर उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांतर्फे आदिवासींसाठी आरोग्य शिबीर

ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होत आहे, तासनतास एकाच जागी जे उभे रहावे लागते. याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वासूचना न देता, त्यांच्याकडून ना हरकत दाखला न घेता त्यांना अंधारात ठेवून कामे सुरू केली आहेत. त्यामुळे पोलिसांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. खरंतर ठाणे महानगरपालिकेने हे सगळे तपासायला हवे होते. महानगरपालिका डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी ते काही तपासले असेल असे मला वाटत नाही. या वाहतूक कोंडीसाठी कोणी जबाबदार व्यक्ती आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion in thane due to unplanned road works allegation by ncp leader jitendra awad to municipality dvr
Show comments