पश्चिम आणि पूर्व डोंबिवलीतून दहा मिनिटांत कल्याणला पोहचण्याचा पर्यायी मार्ग ठाकुर्लीतून उपलब्ध झाल्यानंतर या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहनांनी गजबजून गेला असून गर्दीच्या वेळेत याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या तसेच परत घेऊन येणाऱ्या बसना या कोंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
डोंबिवली ते कल्याण रस्त्यामध्ये ठाकुर्लीचे रेल्वे फाटक आहे. या फाटकाच्या वळणातून मुख्य रस्ता गेला आहे. त्यामुळे फाटकात वाहनांची नियमित कोंडी होते. या कोंडीतून सुटण्यासाठी एकही पर्यायी मार्ग नसल्याने तसेच अनेकदा वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे बहुसंख्य वाहने बराच वेळ जागीच अडकून पडतात.
या रस्त्यावरील वाहतूक बुधवारी दुपारी तब्बल एक तास ठप्प झाली होती. ही कोंडी सोडविण्यात स्थानिक वाहतूक पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे चित्र आहे. ठाकुर्लीतीली हनुमान मंदिर ते म्हसोबानगर झोपडपट्टी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम होणार आहे.
या भागातील गटारे पूर्ण झाल्यानंतर रस्तारुंदीकरण केले जाणार आहे, असे नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी सांगितले. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या भागातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होईल, असे चौधरी यांनी सांगितले. या भागात वाहतूक विभागाने दोन कायमस्वरूपी पोलीस नियुक्त करण्याची मागणी वाहतूक विभागाकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

उड्डाण पूल रखडला
स.वा.जोशी शाळेजवळील उड्डाण पूल झाल्यावर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच रेल्वे फाटक बंद होणार असल्याने या भागातून नियमित वाहतूक करणे प्रवाशांना सहज सोपे होणार आहे. जोशी शाळेजवळील उड्डाण पुलाचे काम झटपट मार्गी लावण्यात पालिकेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. राजकीय इच्छाशक्तीचा रेटा आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता हा पूल उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Story img Loader