कल्याण: शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्ता दुभाजकाची पक्की बांधणी केलेली नाही. या मोकळ्या जागेतून अनेक वाहन चालक वाहने घुसवित असल्याने शिळफाटा रस्त्यावर अलीकडे नियमित कोंडी होत आहे. काही ठिकाणी सरकते दुभाजक उभे करण्यात आले आहेत. वाहन चालक ते बाजुला करून आवश्यक त्या ठिकाणी वाहने नेत आहेत. शिळफाटा रस्त्यावरील या बेशिस्त प्रकारामुळे अनेक महिन्यांपासून कोंडीमुक्त असलेला शिळफाटा रस्ता आता पुन्हा कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे.
शिळफाटा रस्त्यावरील रस्ता मोकळ्या दुभाजकांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा मोटार, ट्रक अडकतो. काही वेळ या रस्त्यावर कोंडी होते, असे स्थानिक रहिवासी सांगतात. शिळफाटा रस्त्यावरील गावांमधून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या ४२ छेद रस्त्यांपैकी ३५ हून अधिक छेद रस्ते वाहतूक विभागाने राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूचनेप्रमाणे बंद केले आहेत. या बंद पोहच रस्त्यामुळे गावातून येणाऱ्या किंवा गावात जाणाऱ्या वाहन चालकांना वळण घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. हा वळसा टाळण्यासाठी अनेक वाहन चालक, प्रवासी शिळफाटा रस्त्यावरील दुभाजकामधील मधल्या मोकळ्या रस्त्याने वाहन आडवे टाकून दुसऱ्या मार्गिकेतून इच्छित स्थळी जातात. दुसऱ्या मार्गिकेत जाताना काही ठिकाणी रस्ता दुभाजकांमध्ये दीड फुटाचा खोल खड्डा आहे. या खड्ड्यात चाक अडकले की तात्काळ वाहन बाहेर येत नाही. ते बाहेर काढेपर्यंत या मार्गिकेतून सर्व वाहने खोळंबून राहतात, असे प्रत्यक्षदर्शी काटईचे ग्रामस्थ नरेश पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा… संप मागे तरीही इंधन तुटवडा कायम
शिळफाटा रस्त्यावरील ढाबे, पेट्रोलपंप चालक यांच्या सोयीसाठी रस्ता दुभाजक अनेक ठिकाणी मोकळे तर काही ठिकाणी बंद केले आहेत. काटई येथे संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या घराजवळील पेट्रोल पंपाची जागा आटोपशीर असल्याने याठिकाणी पेट्रोल, सीएनजी गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यावर लागतात. त्यामुळे इतर वाहनांना पेट्रोल पंपावरील वाहनांचा अडथळा येतो.
अनेक वेळा वाहतूक पोलीस संध्याकाळच्या वेळेत काटई तपासणी नाका येथे उभे राहून मुख्य रस्त्यावर वाहन तपासणी सुरू करतात. या अरूंद भागात तपासणीसाठी एका पाठोपाठ वाहने उभी राहत असल्याने या भागात अनेक वेळा कोंडी होते. शिळफाटा रस्त्याचे रूंदीकरण होऊन चारपदरी रस्ता तयार झाला आहे. यामुळे कोंडी मुक्त शिळफाटाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना अलीकडे पुन्हा कोंडीचा फटाका शिळफाटा रस्त्यावर बसू लागल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.