डोंबिवली- येथील मोठागाव रेतीबंदर भागातील उल्हास खाडीवरील माणकोली पुलाचे मे मध्ये उद्घाटन झाल्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांचा ओघ डोंबिवलीत सुरू होईल. ही वाहने सामावून घेण्याची क्षमता डोंबिवलीतील रस्त्यांची नसल्याने आणि रेतीबंदर फाटकावरील उड्डाण पुलाची एकही वीट अद्याप रचली गेली नसल्याने माणकोली पुलाच्या उद्घाटनानंतर डोंबिवली अभूतपूर्व कोंडीत अडकण्याची शक्यता वाहतूक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाण्यात धुलवडच्या दिवशी हत्येचा प्रयत्न ; भररस्त्यात तलवारीने हल्ला

माणकोली पुलावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर डोंबिवलीतून ठाणे, मुंबईकडे जाणारी आणि तिकडून येणारी लहान, मोठ्या वाहनांची वाहतूक डोंबिवलीतून होणार आहे. या वाहनांना डोंबिवलीत प्रवेश करताना मोठागाव रेतीबंदर येथे दिवा-वसई रेल्वे मार्गाचा अडथळा आहे. या रेल्वे मार्गावर दोन वर्षापूर्वी पालिकेने मोठागाव ते उमेशनगर (रोकडे इमारत) एक उड्डाण पूल प्रस्तावित केला आहे. या पुलाची एकही वीट अद्याप रचली गेली नाही. कल्याण डोंबिवली पालिकेत आता वाहनचालक, फेरीवाले, कामगार यांच्या बदल्यांव्यतिरिक्त कोणताही विकास कामांचा भविष्यवेधी कार्यक्रम प्रशासनाकडून हाती घेतला जात नसल्याने डोंबिवलीतील रहिवासी, शाळा चालक, व्यावसायिक यांना वाहन कोंडीचा मोठा फटका बसणार आहे.

नवीन इमारतीत वाहनतळ रद्द

माणकोली उड्डाण पुलावरुन येणारी वाहने रेतीबंदर रेल्वे फाटकातून पंडित दिनदयाळ रस्ता, उमेशनगर मधून महात्मा फुले रस्ता, गरीबाचापाडा रस्ता, श्रीधर म्हात्रे चौकातून ठाकुर्ली उड्डाण पुलाकडे जातील. बाहेरील अवजड, वाढती वाहन संख्या पेलण्याची क्षमता या रस्त्यांची नाही. माणकोली पुलामुळे दिनदयाळ रस्त्यावरील भविष्यातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन या रस्त्यावर नव्याने उभ्या राहणाऱ्या सात माळा ते १३ माळ्यांपर्यंत इमारतींना पालिकेेने बांधकाम मंजुरी देताना वाहनतळ सक्तीचे करणे आवश्यक आहे. नगररचना विभागातील अधिकारी डोंबिवली पश्चिमेतील एक माजी नगरसेवक आणि त्याच्या मध्यस्थांच्या हातचलाखीला भुलून दिनदयाळ रस्त्यावर वाहनतळ मुक्त नवीन इमारत आराखड्यांना मंजुरी देत आहेत. एक नगरसेवक अशाच एका वाहनतळ नसलेल्या नवीन इमारतीत अलीकडे राहण्यास आला आहे, असे काही विकासकांनी सांगितले.

हेही वाचा >>> Video : लोकल प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, काळ्या फिती लावत आंदोलनद्वारे महिलांनी केला मध्य रेल्वेचा निषेध

कोपर उड्डाण पूल, टंडन रस्ता, कोपर रस्ता, दत्तनगर, प्रगती महाविद्यालय रस्ता भागात स्थानिक वाहनांची सकाळ, संध्याकाळ वर्दळ असते. माणकोली पुलावरुन येणारी वाहने येथून कशी धावणार असा प्रश्न डोंबिवलीतील व्यापारी, व्यावसायिक उपस्थित करत आहेत. माणकोली पूल सुरू झाला तर डोंबिवलीतील मुख्य रस्ते रुंद असावेत म्हणून तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिनदयाळ रस्ता, केळकर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन केले होते. नगरसेवकांनी रवींद्रन यांचे नियोजन हाणून पाडले.

माणकोली पुलाच्या रेतीबंदर बाजुकडील कोपर, आयरे, देवीचापाडा, पत्रीपूल दिशेने जाणाऱ्या वळण रस्त्याची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. माणकोली पूल राजकीय विषय असल्याने वाहतूक अधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाहीत. विकास कामांचे श्रेय घेणारे गुपचिळी धरुन बसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

“माणकोली पूल सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, प्रस्तावित कामे मार्गी लागतील यादृष्टीने प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. कोंडी होणार नाही यादृ्टीने प्रशासनाचे नियोजन आहे.”

अर्जुन अहिरे- शहर अभियंता