कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पातून उड्डाण पूल, वाहनतळ आणि इतर बहुद्देशीय प्रकल्प उभारणीची कामे कल्याण डोंबिवली पालिकेकडून सुरू आहेत. ही विकास कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने अलीकडे त्याचा फटका रेल्वे स्थानक भागात येणाऱ्या रिक्षा, खासगी मोटारी, दुचाकीस्वार यांना वाहन कोंडीच्या माध्यमातून बसत आहे.
उल्हासनगर, विस्तारित कल्याण, भिवंडी परिसरातून नोकरदार वर्ग रिक्षा, खासगी वाहनाने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात सकाळच्या वेळेत येतात. अनेक वेळा या भागात वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक नसल्याने वाहनचालक आडवीतिडवी वाहने रस्त्यावर चालवून वाहतूक कोंडी निर्माण करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
हेही वाचा – नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, भिवंडीत धक्कादायक प्रकार
छाया सिनेमा ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठी अनेक वेळा अर्धा तास लागतो. या कोंडीमुळे निश्चित वेळेतील लोकल निघून जातात. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात अरुंद रस्ते आहेत. पदपथ, त्या लगतचे रस्ते फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले असतात. आयुक्तांनी आदेश देऊनही पालिकेकडून या फेरीवाल्यांंवर कारवाई केली जात नाही. जुजबी कारवाई करून पालिकेचे फेरीवाला हटाव पथक फेरीवाल्यांची पाठराखण करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.
वाहन कोंडी टाळण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील अनेक रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत. त्यामुळे वाहन चालकांंना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. या एक दिशा मार्गिकांची अंमलबजावणी योग्यरितीने होत नाही. त्यामुळे अनेक वाहनचालक उलट दिशेने या मार्गात येऊन वाहन कोंडी करतात.
हेही वाचा – घोडबंदर मार्ग ठप्प, अपघातामुळे कोंडी
लोकल, लांंब पल्ल्याच्या गाड्या कल्याण रेल्वे स्थानकातून धावतात. वेगवेगळ्या प्रांतामधून नागरिक या शहरात येतात. शिळफाटा, मुरबाड, भिवंडी परिसरात प्रवासी वाहतूक करणारी प्रवासी वाहने रेल्वे स्थानकाजवळून धावतात. मागील पाच ते सहा वर्षांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम कल्याण रेल्वे स्थानक भागात सुरू आहे. ते लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे. वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी याठिकाणी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस तैनात असतात, असे सांंगितले.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहेत. ही कामे लवकर पूर्ण करून प्रवाशांची वाहन कोंडीतून पालिका प्रशासनाने मुक्तता करावी. – योगेश दळवी, प्रवासी, कल्याण.