ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे.
नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच विरुद्ध दिशेने वाहतुक करू नये असे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतुक करत होता. या वाहनामध्ये तब्बल ३५ टन वजनांची पोती होती. बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपूलाजवळ आला असता, वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला.
हे ही वाचा…ठाणे : अवघ्या सहा महिन्यांत अपघातांत १३५ जणांचा मृत्यू
त्यानंतर आणखी एक अवजड वाहन येथेच उलटले. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्याप्रमाणात साहित्य असल्याने बुधवारी सकाळी १० नंतरही येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही. या मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेने वाहतुक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.