कल्याण, डोंबिवली, कोळसेवाडी वाहतूक विभागात नववर्षा निमित्त मागील दोन दिवसात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या १०२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या विविध वाहनांवरील चालकांकडून एकूण तीन लाख २८ हजार रुपयांचा दंड वाहतूक विभागाने वसूल केला.
हेही वाचा- कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी नाराज
नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना कोणालाही दुखापत, इजा होणार नाही अशा पध्दतीने वाहने चालवा. मद्यपान करू नका, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले होते. तरीही अनेक वाहन चालक मद्यपान करुन वाहने चालविण्याची शक्यता होती. वाहतूक नियमांचा भंग केला जाण्याची शक्यता असल्याने कल्याण पश्चिम वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी एकूण ८० वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने आपल्या भागात दोन दिवस रात्रीच्या वेळेत विशेष वाहन तपासणी मोहीम राबविली.
हेही वाचा- डोंबिवलीत गणेश मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी तरुणांची गर्दी
या तपासणीत कल्याण पश्चिमेत ४९ जण, कल्याण पू्र्व भागात ३५ आणि डोंबिवलीत १८ जणांनी दारु पिऊन वाहने चालविली असल्याचे वाहतूक विभागाने केलेल्या तपासणीत उघड झाले. या वाहन चालकांवर दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई करण्यात आली, असे तरडे यांनी सांगितले. दोन दिवसाच्या कालावधीत एकूण बाराशे वाहने तपासण्यात आली.
हेही वाचा- ठाण्यात ६५९ मद्यपी वाहन चालक आणि सहप्रवाशांवर कारवाई
कल्याण पश्चिमेत शिवाजी चौक, सुभाष चौक, महात्मा फुले चौक येथे नाकाबंदी करण्यात आली होती. कोळसेवाडी वाहतूक हद्दीत टाटा नाका, चक्की नाका, तिसगाव, काटई भागात, डोंबिवलीत शेलार नाका, मानपाडा रस्ता, फडके रस्ता, ठाकुर्ली पूल भागात नाकाबंदी करुन वाहने तपासण्यात आली. या आक्रमक तपासणी मोहिमेमुळे हल्लडबाजी करत वाहने चालविणाऱ्यांची कोंडी झाली. शिरस्त्राण न घालता वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आसन पट्टा न लावणे अशा वाहन चालकांवर यावेळी कारवाई करण्यात आली.