ठाणे, कल्याण, बदलापूर : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले. या बिकट परिस्थितीमुळे काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तर, महामार्गासह अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाली. रेल्वेसेवाही विस्कळीत झाली.
घोडबंदर येथील चेना पूल, काजूपाडा भागात रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे घोडबंदर येथील गायमुख ते मुंबई अहमदाबाद मार्गावरील चिंचोटीपर्यंत वाहतूक कोंडी झाली. भिवंडीत अनेक भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते.ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८.३० ते दुपारी चार या वेळेत ४७.८८ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा अंबरनाथ तालुक्यात नोंदविण्यात आला.
कोंडीचा ताप कायम..
पावसामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गाला जोडणाऱ्या घोडबंदर येथील चेना पूल परिसरात घोडबंदर रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. मुंबई-अहमदाबाद मार्गावरही पाणी साचल्याने ठाणे येथून बोरिवली, वसई, विरार, भाईंदर आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहन चालकांनी मुंबई नाशिक महामार्गाने वाहतूक सुरू केली.
भिवंडीत बिकट स्थिती..
भिवंडीत रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. बंदर मोहल्ला, अंबिका नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीन बत्ती, कल्याण नाका भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. ईदगाह स्लोटर आणि काकूबाई चाळ भागातील १५० हून अधिक कुटुंबांना इतरत्र हलविण्यात आले.
समाजमाध्यमांवर अफवा..
बारवी धरणाची पातळी गुरुवारी रात्रीपर्यंत ७०.९४ मीटपर्यंत पोहचली असून ७२.६० मीटर पातळी झाल्यास स्वयंचलित दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाणार आहे. असे असले तरी समाजमाध्यमांवर काही छायाचित्र आणि चित्रीकरण प्रसारित झाले होते. त्यामध्ये बारवी धरण ओसंडून वाहत असल्याची अफवा पसरविण्यात आली होती.