वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडलेल्या कल्याण, डोंबिवली शहरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शिळफाटा-टिटवाळा बाह्य़ वळण रस्त्याचा उपाय शोधून काढला आहे. ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’ (एमयूटीपी) प्रकल्पाअंतर्गत वाढत्या नागरीकरणाचा विचार करून कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांबाहेरून जाणारे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. या बाह्य़वळण रस्त्यामुळे पुणे, कर्नाटक, कोकण, गोवा भागातून येणारी वाहने कल्याण, डोंबिवली शहरात प्रवेश करणार नाहीत. या बाह्य़ वळण रस्त्याने थेट मुंबई-नाशिक महामार्गाने नियोजित ठिकाणी जातील, अशी महानगर विकास प्राधिकरणाची योजना आहे. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे ५८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
नागरीकरणाचा मोठा वेग असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांकडे महानगर विकास प्राधिकरणाने पाठ फिरविल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केल्या जात आहेत. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठाणेपल्याडच्या शहरांचा झपाटय़ाने विकास होत असताना या भागातील पायाभूत सुविधांकडे सरकार फारसे गांभीर्याने पाहात नाही, अशा तक्रारी आहेत. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उशिरा का होईना, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसारख्या परिसरात नव्या रस्त्यांची आखणी सुरू केली असून, ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर याच परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, दक्षिण, उत्तर भारतातून येणारी अवजड वाहने कल्याण शहरातून जात असल्याने या परिसरात अभूतपूर्व वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून येणारी वाहने कल्याण, डोंबिवलीला वळसा घालून बाहेरून जावीत, अशी आखणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या भागातील नागरीकरण, वाहतूक कोंडीचा विचार करून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे, असे माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले.
येत्या काळात टिटवाळा ते भिवंडी वळण रस्ता, बदलापूर ते नाशिक महामार्ग जोड रस्ते प्रस्तावित आहेत. या संलग्न प्रस्तावित रस्त्यांचा विचार करून कल्याण बाह्य़ वळण रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे ‘एमएमआरडीए’च्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. या रस्त्यामुळे कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, मुंब्रा वळण, भिवंडी वळण रस्ता भागात नियमित होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
भगवान मंडलिक, कल्याण
कसा असेल रस्ता
’शिळफाटा, काटई, भोपर, कोपर, मोठागाव, रेतीबंदर (डोंबिवली), दुर्गाडी उड्डाण पूल (कल्याण), गंधारे पूल ते टिटवाळा असा रस्ता.
’दक्षिण भारत, पुणे, कोकणातून येणारी वाहने शिळफाटय़ापर्यंत येतील.
’तेथून ती मुंब्रा वळण रस्ता, ठाणे, कळवा भागात न जाता शिळफाटय़ाला संलग्न असलेल्या कल्याण बाह्य वळण रस्त्याने कल्याण शहराच्या दिशेने येतील.
’तेथून ती दुर्गाडी उड्डाण पूल, गंधारे उड्डाण पूल येथील संलग्न रस्त्याने भिवंडी, पडघा वळण रस्त्याने नाशिकसह उत्तर भारतील नियोजित ठिकाणांसाठी मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने निघून जातील.