डोंबिवली- येथील पश्चिम भागातील महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौक आणि माॅनजिनीज चौक येथे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी डोंबिवली वाहतूक विभागाकडे केली आहे.
तसेच महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौक (कोल्हापुरे इस्टेट ) आणि माॅनजिनीज चौक हे वर्दळीचे रस्ते असल्याने या भागात वाहतूक दर्शक बसविण्याची मागणी संघटनेने पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौकात डोंबिवली पूर्व भागातून पंडित दिनदयाळ रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे येणारी वाहने आणि गरीबाचापाडा, नवापाडा, सुभाष रस्ता भागातील वाहने येजा करतात. याशिवाय रेल्वे स्थानकातून उमेशनगर, महाराष्ट्रनगर भागातून जाणारी वाहने याच चौकातून येजा करतात. एकावेळी चारही बाजुने येणारी ही वाहने गणेश चौकात आल्यानंतर याठिकाणी दर्शक यंत्रणा नसल्याने किंवा वाहतूक पोलीस नसल्याने दररोज सकाळ आणि संध्याकळी या चौकात कोंडी होते, असे रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या
सकाळी ११ ते दुपारी एक, संध्याकाळी सहा ते नऊ वेळेत या दोन्ही चौकात वाहतूक पोलीस, सेवक तैनात केले तर या भागात कोंडी होणार नाही. प्रत्येक वाहन चालक पुढे जाण्यासाठी गणेश चौकात, माॅनजिनीज चौकात आपले वाहन पुढे नेतो. त्यामधून कोंडी होत जाते. माॅनिजिनीज चौकात भागशाळा मैदान भागातील वाहने येतात. गुप्ते रस्ता, दिनदयाळ रस्ता भागातून वाहने या रस्त्याने भागशाळा मैदान भागात जातात. माॅनजिनीज चौकातील रस्ते अरुंद असल्याने दोन मोठी वाहने या भागात समोरासमोर आली तर वाहन कोंडी होते, असे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> डोंबिवली: लोढा पलावामध्ये घर विक्री दलालांकडून नोकरदार महिलेला बेदम मारहाण
महात्मा फुले रस्त्यावर वर्दळीच्या रस्त्यावर काही रिक्षा चालक दुतर्फा रिक्षा उभ्या करुन प्रवासी वाहतूक करतात. अशा नियमबाह्य रस्त्यावर रिक्षा उभ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. अरुंद रस्ता, वाहनतळावरील रिक्षांच्या वाढत्या संख्यमुळे महात्मा फुले रस्ता कोंडीत अडकला आहे. या भागातील रहिवाशी या सततच्या कोंडीने हैराण आहेत. संध्याकाळी कामावरुन परतणारे नोकरदार दररोज संध्याकाळी गणेश चौकातील कोंडीत अडकतात. अलीकडे अनेक शाळकरी मुले रिक्षा चालवितात. ही मुले कोणालाही दाद देत नाहीत, अशा तक्रारी आहेत. येत्या गुरुवारपासून शाळा सुरू होत आहेत. शाळांच्या बसची शहरातील संख्या वाढेल. या चौकांमधील कोंडीचा फटका शाळकरी मुलांना बसू नये, म्हणून या चौकात वाहतूक विभागाने पोलीस तैनात करावा. पालिकेने या चौकांमध्ये दर्शक यंत्रणा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रिक्षा संघटनेचे सरचिटणीस भिकाजी झाडे यांनी केली आहे.