ठाणे: शहरात वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणाऱ्या तीन हात नाका चौकात रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना १५ ते २० मिनिटांचा कालावधी जात आहे. आधीच उष्णता त्यात या वाहतूक कोंडीत १५ ते २० मिनिटे अडकून राहावे लागत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात नाका चौक हा महामार्ग आणि शहरातील अंतर्गत मार्गांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ठाण्यातील विविध भागातील जवळपास नऊ रस्ते येऊन या ठिकाणी मिळतात. त्यामुळे साहजिकच तीन हात नाका येथे वाहनांची मोठी रहदारी सुरु असते. गेल्या काही वर्षांपासून या चौकात मेट्रोचे काम सुरू असून, त्यामुळे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. या कामामुळे काही प्रमाणात तीन हात नाका चौकात वाहतूक कोंडी होत होती. त्यात, आता महापालिकेने रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
सध्या तीन हात नाका ते ठाणे स्टेशन मार्गावर हे काँक्रिटीकरण सुरू असून, तीन पदरी रस्त्यांपैकी एक पदरी मार्ग बंद करण्यात आला आहे. यामुळे बेस्ट, टीएमटी बसगाड्या, रिक्षा, दुचाकी, अवजड वाहने या सर्वांना एकाच मार्गाने प्रवास करावा लागत आहे. दिवसभर विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येते. रस्त्याच्या मध्यभागी सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाच्या अवतीभवती अडथळे लावण्यात आले आहे. या कामामुळे यामार्गावरुन वाहने संथगतीने जात आहेत. परिणामी, सिग्नल सुटल्यावरसुद्धा वाहने पुढे सरकण्यासाठी संघर्ष करत आहेत.
वाहनचालकांना अनेक वेळा दोन ते तीन वेळा सिग्नलमध्ये थांबावे लागते, ज्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वाहनचालकांना पाच मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागत आहे. यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे उष्णतेच्या कडाक्यात नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
हे काम करणे गरजेचे…
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने काम हाती घेतले आहे. या कामामुळे पूर्ण रस्ता बंद करण्यात आलेला नाही तर, केवळ एक पदरी (लेन) रस्ता बंद करण्यात आला आहे. हे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण होऊन रस्ता पूर्णपणे वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.