लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एकेरी पद्धतीने सुरु असलेल्या वाहतूकीमुळे वसई – विरार कडून ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांचे शनिवारी हाल झाले. या कोंडीमुळे नागरिकांना १५ ते २० मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता.
आणखी वाचा-Dombivli MIDC Blast: डोळ्यांत काळजी आणि मनात वेदना घेऊन हरवलेल्यांना शोधण्यासाठी नातेवाईकांची धडपड
घोडबंदर मार्ग हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. हा मार्ग अरुंद असल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी घोडबंदर घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शुक्रवारपासून हाती घेण्यात आले. या कामामुळे येथील वाहतूक एकेरी पद्धतीने सोडली जात आहे. त्याचा, परिणाम वाहतूकीवर झाला असून कोंडीत भर पडली आहे. शनिवारी सकाळपासून गायमुख चौपाटी ते वसई गोलानी नाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वसई – विरारकडून ठाण्याच्या दिशेने येणारी ही वाहने असून नागरिकांचे या कोंडीत प्रचंड हाल झाले.