कल्याण – कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील गोविंंद करसन चौकात प्रवासी वाहतुकीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस उभ्या करून ठेवण्यात येतात. या बस मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने या भागात दररोज वाहन कोंडी होते. या बस प्रवासी वाहतुकीसाठी गोविंद करसन चौकात वळविल्या जातात. या मोठ्या बस वळविताना अनेक वेळा वाहन कोंडी होते. या बसचा थांबा बाजारपेठ विभागातील आतील रस्त्यांवर, बाजार समिती भागातील रस्त्यांवर करण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता आता काँक्रीटचा आणि प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अलीकडे वाहन कोंडी होत नाही. परंतु, गोविंद करसन चौकात केडीएमटीच्या प्रवासी वाहतुकीच्या बस या भागात असतात. या बससाठी उभे असलेले प्रवासी चौकात मुख्य रस्त्यावर उभे असतात. एका पाठोपाठ बस रांगेत उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याचा मुख्य भाग व्यापला जातो. त्यामुळे पत्रीपुलाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एका मार्गिकेतून जावे लागते. या रस्त्यावरून अवजड वाहन जात असेल तर ते या बसच्या कोंडीत अडकते.
हेही वाचा – कल्याण लोकसभेत चार महिन्यात वाढले ८३ हजार नवमतदार
अनेक वेळा वाहने करसन चौकात वळण घेऊन वलीपीर रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात ही वाहने या बसमुळे अडकतात. आणि शिवाजी चौकातील वाहने या वाहनांचामागे अडकून पडतात. करसन चौकात केडीएमटीच्या बसमुळे दररोजची कोंडी होत असल्याने या चौकातील बस इतर भागातून प्रवाशांंच्या सोयीप्रमाणे सोडण्यात याव्यात, अशा मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या चौकाच्या परिसरात राहणारे व्यापारी, रहिवासी या सततच्या कोंडीमुळे हैराण आहेत.
हेही वाचा – बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी अडथळा नको म्हणून केडीएमटीच्या बस करसन चौकातून सोडल्या जात असल्याचे समजते.