कल्याण – कल्याण मधील पत्रीपुलाजवळील काँक्रीट रस्ते कामासाठी वाहतूक विभागाने रात्री १२ ते पहाटे पाच एवढ्याच वेळेत कामासाठी परवानगी दिली आहे. या तुटपुंज्या वेळेत रस्ते कामाची गती वाढविणे ठेकेदाराला शक्य होत नाही. त्यामुळे मागील आठवड्यापासून पत्रीपूल वाहन कोंडीत अडकला आहे. शनिवारी संध्याकाळी पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहने खोळंबली होती.
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने अनेक नागरिक पुणे, अलिबाग फिरायला जातात. अशा सर्व वाहनांचा आणि त्यात अवजड वाहतूक सुरू असल्याने शनिवारी संध्याकाळी पत्रीपुलावर वाहनांच्या रांंगा लागल्या होत्या. सुट्टीनिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे यामध्ये सर्वाधिक हाल झाले. या वाहन कोंडीमुळे कल्याण पूर्व,पश्चिम शहरातील अंंतर्गत रस्ते वाहनांनी भरून गेले होते.
हेही वाचा >>>भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने एमएसआरडीसीला रात्री १० ते सकाळी ८ अशी वेळ वाढवून देण्याची सूचना कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी वाहतूक विभागाला केली आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. पत्रीपूल भागात एकूण चार रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे नियोजन आहे. अशाप्रकारे संथगतीने कामे सुरू राहिली तर ही चार कामे पावसाळा सुरू झाला तरी पूर्ण होणार नाहीत. ही कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची सूचना परदेशी यांनी केली आहे.
सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक नागरिक आता वाहनाने कोकण, मूळ गावी जाण्यासाठी वाहनाने निघाले आहेत. त्यांचे या कोंडीत हाल होणार आहेत. स्थानिक रहिवासी या कोंडीने हैराण आहेत.