ठाणे: टेंभीनाका येथे नवरात्रौत्सवाच्या मंडप उभारणीसाठी रस्ता बंद करण्यात आला असून यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ठाणे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय परिसरातील वाहतूकीसाठी हा महत्वाचा रस्ता मानला जातो. वाहन चालकांना अवघ्या पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनीटे लागत आहेत. यामुळे नागरिकांसह चालक हैराण झाले आहेत.
टेंभीनाका येथे दरवर्षी नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सावासाठी गेल्याकाही दिवसांपासून टेंभीनाका मार्गावर देखावा उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी टेंभीनाका चौकातील मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होऊ लागला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. टेंभीनाका हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून ठाणे रेल्वे स्थानक, बाजारपेठ, तलावपालीच्या दिशेने वाहतुक करत असतात. तसेच या परिसरात ठाणे न्यायालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच काही शासकीय कार्यालये आहेत. जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी येत असतात. वाहतुक कोंडीमुळे येथील नागरिकांना कामावर वेळत पोहचता येत नाही.
या परिसरात काही खासगी शाळा आहेत. शाळेच्या बसगाड्या टेंभीनाका, कोर्टनाका येथून वाहतुक करतात. येथील कोंडीत शाळेच्या बस अडकून पडत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. या मार्गावरून टीएमटी आणि राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाड्यांचीही वाहतुक होत असते. या गाड्याही कोंडीत अडकून पडतात. येथून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत आहेत. टेंभीनाका ते ठाणे स्थानक हे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना १५ ते २० मिनीटे लागत आहेत. टेंभीनाका येथील रस्ता अडविल्याबाबत वाहतुक पोलीस शाखेचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांना विचारले असता, यासंदर्भात माहिती घेऊन कळविण्यात येईल असे त्यांनी सांगितले.