लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : टेंभीनाका येथील देवीची आगमन मिरवणूक गुरुवारी दुपारी निघाली होती. या आगमन मिरवणूकीमुळे कोर्टनाका, कळवा, विटावा, जांभळीनाका बाजारपेठ, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोठी वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र होते. या वाहतुक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. तसेच शाळेच्या बस देखील अडकल्या होत्या.

ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सव सुरू केला होता. आनंद दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने टेंभीनाका नवरात्रौत्सव आयोजित केला जातो. गुरुवारी दुपारी येथील देवीची आगमन मिरवणूक निघाली होती. या मिरवणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आणखी वाचा-महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

या मिरवणूकीदरम्यान ठाणे बेलापूर मार्गावर कोर्टनाका ते विटावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नवी मुंबईहून ठाणे, कळवा भागात वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तसेच देवीची मिरवणूक टेंभीनाका परिसरात आली असता, कोर्टनाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठ परिसरात तसेच गडकरी रंगायतन परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे कोर्टनाका ते ठाणे स्थानक हे पाच ते दहा मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना सुमारे अर्धा तास लागत होता. ऐन दुपारच्या सत्रातील शाळा सुटण्याच्या वेळेत ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे शाळेच्या बस या कोंडीत अडकल्या आणि विद्यार्थ्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागला.