डोंबिवली- कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीतील आंगण ढाबा परिसरातील रस्त्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने गतिरोधक बांधला आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बांधल्याने या भागात दररोज वाहने संथगतीने धावतात. पाठोपाठ वाहनांचा रांगा लागतात. सकाळ, संध्याकाळ काटई भागात दररोज वाहतूक कोंडी होते.

पलावा चौक ते काटई परिसरातील रस्ता वगळता शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शिळफाटा दिशेने येणारी वाहने आणि जाणारी वाहने सुसाट वेगाने येजा करतात. मागील आठ महिन्यांपासून कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केलेल्या नियोजनामुळे शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडी मुक्त झाला आहे. या रस्त्याला गाव भागातून येणारे ३० हून अधिक पोहच रस्ते मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा नको म्हणून वाहतूक विभागाने बंद केले आहेत. मागील काही महिन्यांपासून वाहन कोंडी मुक्त असलेला शिळफाटा रस्ता काटई गाव हद्दीतील आंगण ढाब्याजवळ ठेकेदाराने उंचवटा गतिरोधक बांधल्याने पुन्हा कोंडीच्या विळख्यात अडकू लागला आहे.
या गतिरोधकाजवळ येण्यापूर्वी वाहन चालक वाहनाचा वेग कमी करतो. पाठीमागे वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. गतिरोधक उलटून पुढे जाईपर्यंत वाहनाचा वेग संथगती राहत असल्याने काटई भागात वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावरून अवजड ट्रेलर, वाहन जात असेल तर कोंडीमध्ये आणखी भर पडते. रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत शिळफाटा रस्त्यावरुन अवजड वाहनांना परवानगी आहे. नवी मुंबई भागातील वाहतूक पोलीस या वाहन चालकांना अडवत नसल्याने अवजड वाहने शिळफाटा दिशेने येतात. या रस्त्याच्याकडेला अवजड वाहने उभी करण्यास जागा नसल्याने वाहतूक पोलिसांची ही वाहने रोखून धरली तर अडचण होते.

हेही वाचा >>>ठाणे: घोडबंदर मार्गावर सात तासांपासून कोंडी

सकाळी, संध्याकाळी नोकरदार वर्ग अधिक संख्येने शिळफाटा रस्त्याने प्रवास करतो. या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश देऊ नका म्हणून प्रवाशी, लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी वाहतूक विभागाकडे मागणी केली आहे. काही दिवस त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यानंतर हा विषय मागे पडतो. दिवसा शिळफाटा रस्त्यावरुन अवजड वाहने धावत असल्याने अनेक वेळा पलावा चौक, काटई अरुंद परिसरात नेहमी कोंडी होते. आता काटई भागात ठेकेदाराने गतिरोधक बांधल्याने पुन्हा काटई परिसर वाहन कोंडीच्या विळख्यात गेला आहे. या कोंडीचा त्रास प्रवाशांबरोबर आजुबाजुच्या गावांमधील ग्रामस्थांनाही होतो. गावामध्ये वळण घेताना अनेक वेळा वाहने रस्त्यावरची हटत नसल्याने गावात जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते.शिळफाटा रस्ता कोंडीमुक्त ठेवण्यासाठी एमएसआरडीसीने काटई भागात बांधलेला गतिरोधक तात्काळ हटवावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader