डोंबिवली- येथील एमआयडीसीत शनिवारी सकाळी एक झाड केडीएमटीच्या बसवर कोसळले. दुसऱ्या घटनेत शुक्रवारी रात्री देसलेपाडा भागात विजेचा खांब रस्त्यावर मुसळधार पावसाने वाकला. या दोन्ही घटनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. या परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. बसमध्ये प्रवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही. बसच्या टपाचे नुकसान झाले आहे. एमआयडीसीतील शेवटच्या बस थांब्यावर केडीएमटीची बस उभी होती. बसमध्ये प्रवासी नव्हते. बस थांबा भागातील गुलमोहराचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. झाडाच्या फांद्या एसटीच्या टपावर पडल्या. झाड कोसळल्यानंतर काही फांद्या जीवंत वीज वाहिनीला लागल्याने वीज पुरवठा खंडित झाला. रस्त्यावर झाड पडल्याने अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत या भागात वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालक पर्यायी मार्गाने येजा करत होते.
हेही वाचा >>> ठाण्यात एसटी बसचा अपघात, दोन जखमी
डोंबिवली जवळील देसलेपाडा भागात शुक्रवारी रात्री विजेचा खांब रस्त्यावर वाकला. नागरी वस्तीत हा प्रकार घडल्याने काही वेळ परिसरात गोंधळ उडाला. तात्काळ या भागाचा वीज पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी बंद केला. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर खांब वाकल्याने या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी तातडीने वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवून खांब सुस्थितीत करेपर्यंत या भागात कोंडी होणार याची काळजी घेतली. अज्ञात वाहनाने खांबाला धडक दिल्यामुळे खांब वाकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महावितरणचे नांदिवली विभागाचे उपअभियंता पद्माकर हटकर, साहाय्य अभियंता रवींद्र नाहिदे कनिष्ठ अभियंता प्रशांत राऊत यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर वाकलेला खांब सुस्थितीत करणे, देसलेपाडा, नांदिवली भागाला तात्पुरता वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले.