डोंबिवली पूर्व भागातील वर्दळीच्या मानपाडा, एमआयडीसीतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामासाठी गेल्या वर्षी डिसेंबरपासून खोदून ठेवले आहेत. या रस्ते कामांमुळे वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली आहे. पर्यायी रस्ते अरुंद, गल्लीबोळातील असल्याने आणि एकाचवेळी जड, अवजड, लहान वाहनांचा भार या रस्त्यांवर आल्याने हे रस्ते सकाळ, संध्याकाळ वाहन कोंडीत अडकत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे-बोरिवली प्रवास केवळ २० मिनिटांत, भूमीगत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा जारी; पावसाळ्यात कामाला सुरुवात

कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या अंतर्गत हे रस्ते येतात. या विभागाचे वाहतूक पोलीस रस्ते, चौक भागात तैनात असतात, पण अंतर्गत पोहच रस्ते, वाहनांचा वाढता भार विचारात घेता पोलिसांच्या आवाक्याबाहेर अनेक वेळा परिस्थिती जात आहे. काही दिवसांपासून पूर्व भागातील पी ॲन्ड टी काॅलनी, गांधीनगर, मानपाडा रस्ता, घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकत आहे.

हेही वाचा- प्रत्येक चेंडू सीमापार; क्रिकेटच्या मैदानात एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम

घरडा सर्कल रस्ता

घरडा सर्कल रस्ता ते आर. आर. रुग्णालय रस्ता दरम्यान बर्गर प्लाझा हे नवीन व्यापारी संकुल, के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय, माऊली सभागृह आणि इतर दुकाने आहेत. एका वाहन विक्रीचे प्रदर्शनी विक्री दालन याठिकाणी आहे. घरडा सर्कल चौकात आजदे पोहच रस्त्यावर बस थांबा, रिक्षा चालकांच्या रिक्षा दोन ते तीन रांगांमध्ये उभ्या असतात. कॅ. सचान स्मारकाच्या बाजुला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर खासगी वाहन चालकांच्या लांब पल्ल्याच्या बस उभ्या असतात. त्याचवेळी घरडा सर्कल भागात संध्याकाळच्या वेळेत ठाणे, मुंबई भागात आपल्या खासगी वाहने, भाड्याच्या वाहनांनी नोकरीला गेलेला नोकरदार अधिक संख्येने शहरात येतो. ही सर्व वाहने घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयाच्या दरम्यान कोंडीत अडकतात.
बर्गर प्लाझा व्यापारी संकुला बाहेर वर्दळीच्या रस्त्यावर ग्राहक वाहने उभे करुन खरेदीसाठी जातात. त्या वाहनांच्या बाजुला रिक्षा चालक, घरपोच सेवा देणाऱ्या वितरकांच्या दुचाकी उभ्या असतात. माऊली सभागृहाच्या बाहेर दर्शनी भागात चारचाकी, दुचाकी वाहने उभी असतात. अशीच परिस्थिती पेंढरकर महाविद्यालायच्या बाहेरील रस्त्यावर काटकोनात दुचाकी अधिक संख्येने उभ्या असतात. संध्याकाळच्या वेळेत या भागात फेरीवाले हातगाड्या लावतात. या गाड्यांसमोर ग्राहकांची गर्दी, त्यांची वाहने त्यामुळे हा तिठा संध्याकाळच्या वेळेत वाहन कोंडीत अडकतो, असे या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा- “जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के”, महापालिकांमधील घोटाळ्यांवरुन मनसेची शिवसेनेवर टीका

यापूर्वी कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडीत प्रवासी एक ते दीड तास अडकत होता. मागील तीन महिन्यांपासून शिळफाटा रस्त्यावरील कोंडी कमी झाली असून आता डोंबिवलीत एमआयडीसी किंवा घरडा सर्कलमार्गे शहरात प्रवेश करताना प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागतो. अर्धा ते पाऊण तास अनेक वेळा ही वाहने कोंडीत अडकून पडतात. कामावरुन परतताना वेळेत घरी पोहचू म्हणून गणिते केलेल्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. महिला नोकरदार वर्गाला सर्वाधिक त्रास या कोंडीचा होतो.

प्रवाशांच्या सूचना

वाहतूक विभागाने घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय दरम्यान सकाळ आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून या भागात टोईंग व्हॅन फिरवावी. रस्त्यावर लावून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करावी. या रस्त्यावर एकही चारचाकी, दुचाकी वर्दळीच्या रस्त्यावर उभी राहणार नाही याची काळजी घ्यावी. माऊली सभागृह, पेंढरकर महाविद्यालय आणि बर्गर प्लाझा तिठ्यावर जी वाहने घोळक्याने उभी केली जातात. त्या वाहनांवर कारवाई करावी. ही कारवाई सकाळी आठ ते दुपारी ११ आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत केली तर या भागात वाहन कोंडी होणार नाही, असे या रस्त्यावरुन नियमित येजा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा- माळशेज घाटात नवा बोगदा?

“मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पर्यायी रस्ते अरुंद, त्यांना पु्न्हा पोहच रस्ते आहेत. या रस्त्यांवरुन सर्व प्रकारची वाहने धावतात. या रस्त्यांवर कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाते. घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय परिसरात कोंडी होणार नाही याची पाहणी करुन कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in dombivli east area dpj
Show comments