कल्याण : कल्याण शहरातील विविध रस्त्यांवर शनिवारी सकाळी अचानक अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका दहावी, बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसला. या वाहतूक कोंडीत शिवाजी चौक, मुरबाड रस्ता, वलीपीर, लालचौकी, सहजानंद चौक परिसर अडकला होता.

मुरबाड रस्त्यावर बाईच्या पुतळ्याजवळ उड्डाण पुल येथे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान रस्ते कामासाठी एक अजवड वाहन रस्त्याला आडवे उभे करून कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. बाईच्या पुतळ्याजवळ रेल्वे स्थानकाकडे जाणारी आणि रेल्वे स्थानकाकडून बिर्ला महाविद्यालय, शहाडकडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेतून सुरू झाल्याने या रस्त्यावर कोंडी सुरू झाली. अनेक वाहन चालक परळीकर वसाहत, डाॅ. म्हसकर रुग्णालय येथील गल्ल्यांमधून संतोषी माता रस्तामार्गे इच्छित स्थळी गेले. मुरबाड रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक पर्यायी अंतर्गत गल्ली बोळातील रस्त्यावरून वाहने नेऊ लागले. एकाचवेळी ही वाहने समोरासमोर आल्याने मुरबाड रस्त्याच्या अंतर्गत गल्ल्यांमध्ये कोंडी झाली.

वाहतूक पोलिसांची तुटपुंजी संख्या असल्याने चौकाचौकात झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने वाहन चालक मिळेल त्या मोकळ्या जागेतून, पदपथावरून दुचाकी नेऊन इच्छित स्थळी जात होते. घुसखोर वाहन चालकांनी कोंडीत आणखी भर पडली. शहाड, बिर्ला महाविद्यालय परिसरातून येणारी वाहने मुरबाड रस्त्यावर कोंडीत अडकली. मुरबाड रस्त्याकडे संतोषी माता मार्गे येणारी वाहने मुरबाड रस्ता आणि संतोषी माता रस्त्यांमधील गल्लीत अडकली. यामुळे सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.

शनिवारी सकाळच्या वेळेत कल्याण शहर वाहतूक कोंडीत अडकले. प्रवाशांबरोबर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना, मालवाहतूकदार यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला. कोंडी झाल्यानंतर ही कोंडी सोडविण्यासाठी मग प्रत्येक चौक, रस्त्यावर वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत होते.

Story img Loader