ठाणे आणि भिवंडी शहरांच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागात बुधवारपासून वाहतूक कोंडी लागली असून गुरुवारीही हेच चित्र कायम होते. ५ ते १० मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्यामुळे कशेळी-काल्हेरवासीय हैराण झाले आहेत. या कोंडीत शालेय बसगाड्या अडकून पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यातच बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू असल्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अशाचप्रकारे कशेळी-काल्हेर भागातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात विविध साहित्यांची गोदामे असून येथून अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतूक सुरू असते. या मार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहनांचा वेग मदावल्याने कोंडी होत आहे. त्यातच वाहन बंद पडण्याचे प्रकार घडत असल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर अनेकजण कोंडी टाळण्यासाठी विरुद्ध दिशेच्या मार्गावरून प्रवास करीत असल्यामुळे कोंडी आणखी वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील आईस फॅक्टरी-मानपाडा पोहच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला प्रारंभ

कशेळी-काल्हेर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्याप्रमाणात नागरीकरण झाले असून या भागात होणाऱ्या कोंडीचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. सकाळ आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत रिक्षा आणि बस कोंडीत अडकून पडत असल्यामुळे नागरिकांना कापूरबावडी आणि काल्हेर येथून रिक्षा आणि बस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक पायी प्रवास करीत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी हे चित्र या भागात दिसून आले. शालेय बसगाड्या कोंडीत अडकून पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यास उशीर होत असून त्यांचे कोंडीमुळे हाल होत आहेत. त्यातच बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू असल्यामुळे येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे कोंडीबरोबरच विजेची समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in kasheli kalher area amy