बाजारपेठेतील गर्दीमुळे वाहतूक कोंडीत भर
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने रविवारी ठाण्यातील बाजारात खरेदीचा उत्साह होता. सकाळपासूनच राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका, स्थानक परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. मखर सजावटीपासून, गणपतीची आरास करण्यासाठी लागणाऱ्या शोभेच्या माळांपर्यंत, पूजा साहित्यापासून ते फुलांपर्यंत सगळ्याच गोष्टी खरेदी करण्यासाठी झुंबड होती. कोर्टनाका ते स्थानक परिसरातील या गर्दीत वाहनांच्या रांगा असल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण, डोंबिवलीतही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.
गणेशोत्सवापूर्वी रविवारची सुट्टी असल्याने अनेक गणेशभक्तांनी खरेदीसाठी जांभळीनाका, गोखले रस्त्यावरील बाजारपेठांमध्ये हजेरी लावली होती. गोखले रोड, राममारुती रोड, ठाणे स्टेशन परिसर, स्टेशन रोड, जांभळी नाका या भागांमध्ये दुपारनंतर गर्दीचा ओघ वाढला होता. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कोर्टनाका परिसरातून टीएमटीच्या काही बस गाडय़ा जांभळीनाका चौकातून मार्गक्रमण करत असतात. या चौकातच चारही बाजूला बाजारपेठ असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. रविवारी या बाजारपेठेत एकाच वेळी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही तास खोळंबली होती.
प्रवाशांचा खोळंबा
कळवा-खारेगावहून येणाऱ्या बस कोर्टनाका मार्गावरून ठाणे रेल्वे स्थानकात येतात, मात्र बाजारपेठेतील गर्दीमुळे या सर्व बस एकापाठोपाठ रस्त्यात खोळंबल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांनी बसचा प्रवास अध्र्यावरून सोडून पायी चालत रेल्वे स्थानक गाठले. मराठी ग्रंथसंग्रहालय ते ठाणे रेल्वे स्थानक या रस्त्यांवरून येणारी वाहने दोन्ही बाजूकडील नागरिकांच्या कचाटय़ात अडकली होती. त्यामुळे एरवी ५-१० मिनिटांत कापता येणारे अंतर कापण्यासाठी रविवारी अर्धा तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे रविवारी सायंकाळी जांभळीनाका परिसरातील खासगी वाहनांची वाहतूक ठाणे वाहतूक पोलिसांकडून बंद ठेवण्यात आली होती. ही वाहतूक चिंतामणी चौकातून वळविण्यात आली होती, अशी माहिती ठाणे नगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीतही कोंडी..
मेगाब्लॉकमुळे कल्याण-डोंबिवलीकरांनी ठाणे-दादर गाठण्याऐवजी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. कल्याणमधील दीपक हॉटेल, पुष्कराज हॉटेल ते शिवाजी चौक या परिसरात खरेदीसाठी गणेशभक्तांनी गर्दी ओसंडून वाहत होती. त्याचबरोबर डोंबिवलीतील पूर्व-पश्चिम रेल्वे स्थानक परिसर, फडके रोड, मानपाडा, रामनगर गणपती बाजारातही मोठी गर्दी होती.