ठाणे महापालिकेचा एमएमआरडीएकडे प्रस्ताव
उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने होणारी अवजड वाहतूक तसेच नवी मुंबई ते कल्याणदरम्यान वाढलेली वाहनांची वर्दळ यांमुळे वाहतूक कोंडीचे जंक्शन ठरत असलेल्या शीळ मार्गासाठी ठाणे महापालिकेने नवीन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कल्याण येथून नवी मुंबई महापेकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव असून शीळ फाटा येथे उड्डाणपूलही उभारण्याचे प्रस्तावित आहे.
जेएनपीटी बंदरापासून भिवंडीच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गाहून मुंब्रा बाह्यवळण रस्त्यामार्गे होत असते. गेल्या काही वर्षांत कल्याण-शीळ मार्गालगत मोठे गृहप्रकल्प उभे राहिले असून या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या काही लाखांच्या घरात पोहोचली आहे. हे लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मंजूर विकास आराखडय़ानुसार जुन्या मुंबई-पुणे रस्त्याच्या ६० मीटर रुंदीकरणाचे काम यापूर्वीच हाती घेतले आहे. या रस्त्यामध्ये एकूण दोन ठिकाणी उड्डाणपुलांची आखणी करण्यात आली होती. मुंब्रा बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या वाय जंक्शन तसेच शीळ फाटा ते कल्याण फाटा असे दोन उड्डाणपूल उभारले जाणार होते, मात्र शीळ फाटय़ावरून प्रस्तावित बुलेट ट्रेनचे नियोजन असल्याने शीळ फाटा ते कल्याण फाटा हा उड्डाणपूल महानगर प्राधिकरणाने रद्द केला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वाहतूक सुधारणेसाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याची चाचपणी महापालिकेकडून सुरू होती. त्यानुसार पालिकेच्या नियोजन विभागाने सविस्तर प्रस्ताव तयार केला असून त्यात भुयारी मार्ग व अन्य ठिकाणी उड्डाणपुलांचा पर्याय सुचवण्यात आला आहे. हा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एमएमआरडीएकडे सादर करण्यात आला आहे. ‘शीळ भागातील एमएमआरडीएचे वाहतूक नियोजन अधिक परिपूर्ण व्हावे, यासाठी स्थानिक नियोजन प्राधिकरण या नात्याने ठाणे महापालिकेने एमएमआरडीएकडे प्रस्ताव सादर केला आहे. यापैकी काही प्रस्तावांना राजीव यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे,’ अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
महापालिकेचा प्रस्ताव
- मुंब्रा आणि महापेकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार करावा.
- कल्याण बाजूने महापेकडे एमआयडीसी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी चार मार्गिकांच्या उड्डाणपुलांची उभारणी करावी.
- कल्याण बाजूने पनवेलकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलावरून पनवेलकडे पर्यायी जोडरस्ता तयार करावा.
- पनवेलहून कल्याणकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी दोन मार्गिकांचा स्वतंत्र उड्डाणपूल उभारला जावा. हे केल्यास कल्याण फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.
- शीळ फाटा आणि कल्याण फाटा जंक्शनवरील रद्द करण्यात आलेल्या उड्डाणपुलाऐवजी शीळ जंक्शन येथे स्वतंत्र उड्डाणपुलाची उभारणी करावी. जेणेकरून मुंब्रा आणि कल्याण तसेच पनवेलहून येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत होऊ शकेल.