|| किशोर कोकणे

खारेगाव फाटकातील वाहनांच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास बंद

वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होणे नित्याचेच आहे. मात्र मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी खारेगाव फाटकात वाहतूककोंडी झाली. रेल्वेमार्गावर उभी राहिलेली वाहने हटवताना रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यासाठी तब्बल पाऊण तास रेल्वे फाटक खुले आणि लोकल वाहतूक बंद ठेवावी लागली. धिम्या मार्गावरील काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या कोंडीमुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक दुपापर्यंत विस्कळीत होती.

कळवा येथे खारेगाव रेल्वे फाटक आहे. या फाटकातून कळवा पूर्व आणि पश्चिमेकडे दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. फाटकाजवळ चार रस्ते मिळतात. कळवा पूर्व भागातील घोलाईनगर, आतकोनेश्वरनगर, शिवशक्तीनगर, पौंडपाडा, भास्करनगर तसेच रेल्वे स्थानक परिसराच्या दिशेने जाणारे रस्ते इथे एकत्र येतात. त्यामुळे इथे नेहमीच मोठी कोंडी होते आणि सोडवताना वाहतूक पोलीस आणि रेल्वे यंत्रणेच्या नाकीनऊ येतात.

मंगळवारी सकाळी या कोंडीचा कहर झाला. सकाळी ९.५२च्या सुमारास रेल्वे फाटकातून ये-जा करणाऱ्या खासगी वाहनांचा भार वाढला. फाटकात वाहने वेडीवाकडी उभी करण्यात आली होती. त्यामुळे धिम्या लोकल गाडय़ांची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली. वाहतूक सुरळीत केल्यानंतर १० वाजून ६ मिनिटांनी फाटक बंद करण्यात आले. त्यानंतर येथून ये-जा करणाऱ्या एक-दोन लोकल पुढे जाऊ देण्यात आल्या. काही वेळाने पुन्हा याच फाटकात मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे १० वाजून १६ मिनिटांनी फाटक खुले करण्यात आले.

दरम्यान, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांनी लांबपर्यंत गेलेल्या वाहनांना पुन्हा मागे घेत ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत १०.४३ झाले. या वाहतूक कोंडीचा फटका हजारो रेल्वे प्रवाशांना बसला. पाऊण तासात धिम्या मार्गिकेवरील एकही रेल्वेगाडी मुंबईहून कल्याण, कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने गेली नव्हती. त्यामुळे पाऊण तासात मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यामुळे लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकाचा सकाळी १०.०० ते दुपारी १२.३० पर्यंत बोजवारा उडाला. रेल्वेने या दरम्यान काही फेऱ्या रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुलाची रखडपट्टी

कळव्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी मध्य रेल्वे आणि महापालिका पुलाचे बांधकाम करत आहेत. रेल्वेने त्यांच्या हद्दीत येणाऱ्या भागात पुलाची उभारणी केली आहे. मात्र महापालिकेने अद्यापही काम पूर्ण केलेले नाही. गेल्या १० वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मध्य रेल्वेच्या रोजच्या वाहतुकीला याचा मोठा फटका बसत आहे. हजारो प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रवासी संतप्त

‘अर्ध्या तासापासून रेल्वे स्थानकात गाडीची वाट पाहत आहे, मात्र गाडी आलेली नाही. कार्यालयात उशिरा पोहचल्याने संपूर्ण दिनक्रम बदलेल याचा परिणाम कार्यालयातील कामकाजावर होईल,’ अशा शब्दांत जितेंद्र खारकर या प्रवाशाने नाराजी व्यक्त केली. ‘रेल्वेचा रोजच खोळंबा होतो. सकाळी गाडय़ा वेळेत नसल्याने मला खासगी वाहनाने भांडुपला जावे लागले,’ असे दीप्ती गावकर यांनी सांगितले.