लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनीजवळ ट्रक शुक्रवारी पहाटे बंद पडला. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन महामार्गावर दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली. नितीन कंपनीपासून ऐरोलीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मुंब्रा बाह्यवळण महामार्ग बंद असल्याने कोंडीत भर पडली.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग जातो. या मार्गावर वाहनांची दिवस रात्र वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहने या रस्त्यावर वाहतूक करतात. या मार्गावरून रात्री ११ ते ६ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतुक सुरू असते. या मार्गावरील नितीन कंपनीजवळ शुक्रवारी पहाटे ६ वाजता ट्रक बंद पडला. यामुळे मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली. अवजड वाहतूक ठप्प झाली असतानाच सकाळी नोकरदार वर्गाची वाहने रस्त्यावर आली. यामुळे कोंडीत भर पडली.

हेही वाचा… ठाण्यात भाजप – शिंदेगटात राडा; भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नितीन कंपनीपासून ऐरोलीपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मुंब्रा बाह्यवळण महामार्ग बंद असल्याने कोंडी आणखी वाढली. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू केले. एक ते दीड तासाने ट्रक बाजूला करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर अर्ध्या ते एक तासाने महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. या कोंडीचा फटका ठाणे आणि नवी मुंबई शहरातील नोकरदार आणि वाहनचालकांना बसला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in thane city at morning due to truck breakdown dvr