ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीच्या दृष्टिने अंत्यत महत्त्वाच्या असलेल्या खारेगाव आणि साकेत पूलाच्या दुरुस्ती कामास बुधवारपासून सुरुवात झाली. या दुरुस्ती कामाचा पहिल्याच दिवशी परिणाम जाणवला. साकेत पूल ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी, घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि खारेगाव ते भिवंडीतील मानकोली नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली. अवघ्या १५ ते २० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागत होता. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे हाल झाले. दुपारी तापमान वाढले होते. त्यामुळे दुचाकी चालकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव हे पूल अत्यंत अरुंद आहेत. पावसाळ्यात या पूलांवर खड्डे पडल्यास त्याचा परिणाम ठाणे आणि भिवंडी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळास दोन्ही पूलाची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. ही दुरुस्ती १० एप्रिलपासून केली जाणार होती. परंतु तांत्रिक अडचणींमुळे तसेच खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमामुळे ही दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली होती. अखेर बुधवारपासून ही दुरुस्ती सुरुवात करण्यात आली आहे. साकेत आणि खारेगाव पूल हे चार पदरी आहेत. यातील एक पदरी मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या पूलाच्या केवळ तीनच पदरी मार्गिका वाहन चालकांसाठी उपलब्ध आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजतापासून दुरुस्ती कामास सुरूवात करण्यात आली. या दुरुस्तीच्या कामाचा पहिल्याच दिवशी शहरात परिणाम जाणवला.

हेही वाचा… घोडबंदरमधील आणखी २२ गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा

हेही वाचा… डोंबिवली: शास्त्रीनगर रुग्णालयात श्वान दंश इंजेक्शनचा तुटवडा; दुखापतींवर उपचार होत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी

साकेत पूल ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी, घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि भिवंडी येथील मानकोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नाशिक, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या १५ ते २० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे तासभर लागत होता. दुपारच्या वेळेत तापमानामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे उन्हाच्या त्रासामुळे वाहन चालकांचे हाल झाले. दुपारी तीन नंतरही कोंडी कायम होती. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. ही कोंडी काही दिवस अशीच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in thane city due to saket and kharegaon flyover repair work asj