लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: जिल्ह्यातील मुख्य महामार्ग, मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी यामुळे शनिवारी जिल्ह्यात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील मुंबई नाशिक महामार्ग, कशेळी भिवंडी मार्ग, घोडबंदर, शिळफाटा या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे कोंडीत भर पडली होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले. अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे पाऊण तास लागत होता.

ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, शिळफाटा या मुख्य मर्गासह अंतर्गत मार्गावरून मोठ्याप्रमाणात वाहतूक होते. जिल्ह्यात बुधवारपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहारात काही ठिकाणी मुख्य मार्गावर खड्डे पडले आहेत. तर काही भागात रस्त्यावर पाणी साचले आहे. खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि कशेळी भिवंडी मार्गावर पडला. मुंबई नाशिक महामार्गावर ओवळी भागात खड्डे पडले आहेत. त्यामुळे खारेगाव ते रांजनोली पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. कशेळी भिवंडी मार्गावर पूर्णा भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने तसेच अवजड वाहनांमुळे कशेळी ते नारपोली पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील कोंडीमुळे वाहन चालकांना १५ मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास लागत होता.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ हुक्का मेजवानी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा

घोडबंदर मार्गावरही मेट्रोची कामे, खड्डे आणि सेवा रस्ते वाहतुकीस पूर्णपणे उपलब्ध नसल्याने कोंडी झाली होती. शिळफाटा मार्गावरही उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मार्गावर सुरू असलेली कामे आणि अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवीत असल्याने कोंडीत भर पडली. या मार्गावर वाय जंक्शन ते शीळ डायघर पोलीस ठाणे पर्यंत वाहतूक कोंडी झाली. ठाणे बेलापूर मार्गावरही कळवा विटावा भागात वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे चित्र होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in thane district mrj
Show comments