शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकाच वेळी गर्दी; दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे संपूर्ण शहर सोमवारी दुपापर्यंत कोंडीत अडकले होते. ठाणे, नवी मुंबई, कळवा तसेच आसपासच्या शहरांमधून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दाखल झाल्याने सकाळपासूनच कोंडी सुरू झाली होती.

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास २ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अमावास्येमुळे तसेच मुहूर्त नसल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हते. गुढीपाडव्यानंतरचा म्हणजेच सोमवारचा मुहूर्त साधत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पक्षांनी एकाच वेळी रॅली काढली आणि दोन्ही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेनेने तलावपाळी येथील मध्यवर्ती शाखेजवळून रॅली काढली. ही रॅली राम मारुती रोड, गोखले रोड, गावदेवी मैदान, ठाणे स्थानक, मुख्य बाजारपेठमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आली. त्यामुळे जिल्हा शाखेजवळचा रस्ता वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला होता. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली नेण्यात आल्याने तलावपाळीसह अन्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

राष्ट्रवादीने पाचपाखाडी येथील पक्ष कार्यालयाजवळून रॅली काढली होती. पाचपाखाडी, अल्मेडा मार्ग, गजानन महाराज चौक, राम मारुती रोड, तलावपाळी, जांभळीनाका, टेंभीनाका, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्गे ही रॅली काढण्यात आली. त्यामुळे नितीन कंपनी, पाचपाखाडी, मासुंदा तलाव, टेंभीनाका, जिल्हा रुग्णालय, कोर्ट नाका या भागात वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीचा फटका कळवा पुलावरील वाहतुकीलाही बसला. दुपारी उशिरापर्यत ही कोंडी कायम होती.

चर्चा आणि कुजबुज

ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यापूर्वी अनेक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. यंदा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन तोकडे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पूर्वीसारखा उत्साह नसल्याची कुजबुज काही जुन्या शिवसैनिकांमध्ये सुरू होती.

रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्यांना विलंब

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकाच वेळी जमल्याने कोर्ट नाका येथेही कोंडी झाली होती. रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारा मार्ग असल्याने तिथे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना तब्बल अर्धा तास ताटकळावे लागले. या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती.

भिवंडीतही वाहतूक कोंडी 

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदार कपील पाटील यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी भिवंडीतील शिवाजी चौकातून प्रांत कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याने रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.