डोंबिवली पूर्व मानपाडा छेद रस्त्या वरील गणेश गल्लीच्या कोपऱ्यावर संध्याकाळी पाच नंतर रात्री उशिरापर्यंत एक पाणीपुरी विक्रेता हातगाडी लावून व्यवसाय करतो. मानपाडा रस्त्यावरुन येऊन बालभवन, केळकर दिशेने वळण घेऊन जाणाऱ्या वाहनांना ही हातगाडी आणि त्या समोरील ग्राहकांच्या वाहनांचा अडथळा येतो.त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावरील जिना बंद केल्याने प्रवाशांचे हाल
वाहतुकीला अडथळा ठरणारी गणेश गल्लीच्या प्रवेशव्दारावरील मोनिका ॲनेक्स दुकाना समोरील हातगाडीवर पालिकेने कारवाई करावी म्हणून प्रवाशांनी पालिकेकडे तक्रार केल्या आहेत. वाहतूक शाखेने डोंबिवली शहराच्या विविध भागातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या काढून टाकण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पालिकेच्या ग प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. ग प्रभागाने मागील सहा महिन्याच्या काळात रामनगर, राजाजी रस्ता, दत्तनगर, कस्तुरी प्लाझा भागातील सुमारे १५० हून अधिक हातगाड्या जप्त केल्या आहेत. काही हातगाड्या जागीच तोडून टाकल्या आहेत. मग, मोनिका ॲनेक्स समोरील हातगाडीवर पालिका अधिकारी कारवाई का करत नाहीत, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये इमारतीत शिरला बिबट्या, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
गणेशगल्लीतून जाणारी वाहने
नवी मुंबई भागातून येणाऱ्या नवी मुंबई परिवहन विभागाच्या बस, केडीएमटीच्या बस मानपाडा रस्त्याने येऊन गणेश गल्ली (डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा) रस्त्यावरुन टंडन रस्ता, कोपर पुलावरुन शास्त्रीनगर भागात जातात. याच रस्त्यावरुन खासगी वाहने, रिक्षांची पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. संध्याकाळी गणेश गल्ली रस्त्यावर पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसते. अशा वर्दळीच्या ठिकाणी एक हातगाडी मालक पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत असल्याने परिवहन उपक्रमाच्या मोठ्या बस या भागातून वळताना अडथळा येत आहे. हातगाडी समोर ग्राहकांची दुचाकी, चारचाकी वाहने, त्याच्या समोर ग्राहक अशी वर्दळ या भागात असते. अलीकडे ही वर्दळ वाढली आहे. मोनिका ॲनेक्स समोरील हातगाडी बरोबर शिवसेना शाखे समोरील (बाळासाहेबांची शिवसेना) हातगाड्या उचलण्याची मागणी पादचारी करत आहेत.
मोनिका ॲनेक्स समोरील हातगाडी लावणारा मालक हा हातगाडीवर कारवाई केली की खोट्या तक्रारी पोलीस, वरिष्ठांकडे करतो. खोटे आरोप तक्रारीत केले जातात. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती माहिती अधिकारात मागवून त्याला त्रास दिला जातो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करताना विचार करावा लागतो, असे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
हेही वाचा >>>भिवंडी ते इमारतीत बांधकामाचे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
तसेच, पालिका विभागीय कार्यालया जवळील पी. पी. चेंबर्स माॅल जवळील चहा टपरीजवळ संध्याकाळच्या वेळेत अनेक रिक्षा चालक चहा टपरी समोर रिक्षा उभी करुन बाजारात खरेदीसाठी जातात. या रिक्षा चालकांवर वाहतूक आणि पालिकेने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
“ गणेश गल्लीतील मोनिका ॲनेक्स समोरील हातगाडी विषयी नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. पोलीस बंदोबस्त घेऊन या हातगाडी चालकावर कारवाई केली जाईल.”– संजय साबळे,साहाय्यक आयुक्त,ग प्रभाग, डोंबिवली