गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा परिणाम म्हणून शनिवारी सकाळपासूनच कल्याण अहमदनगर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कल्याणहून अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हारळ गावापासून थेट कांबा गावापर्यंत ही वाहतूक कोंडी होती. त्यामुळे असंख्य वाहने तासंतास रस्त्यावर खोळंबली होती.
या रस्त्याची डागडुजी वेळेत करणे आवश्यक होते –
म्हारळ गावापासून कांबापर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून जिल्हातंर्गत मोठी वाहतूक होत असते. सोबतच या महामार्गावर उल्हासनगर महापालिका क्षेत्र, म्हारळ, वरप, कांबा, रायते ते थेट मुरबाडपर्यंत अनेक गावं आहेत. या गावांची वाहतूकही याच महामार्गावरून होत असते. गेल्या काही वर्षात या महामार्गाच्या दोन्ही बाजूला टोलेजंग इमारती उभा राहिले आहेत. शेकडो इमारती येथे आजही उभारल्या जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत या रस्त्याची डागडुजी वेळेत करणे आवश्यक होते. खड्ड्यांमुळे गेल्या काही वर्षात अनेकांना येथे आपले प्राण गमवावे लागले आहे. गेल्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खड्डे मोठे झाले असून येथून वाहनांना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.
विद्यार्थ्यांवर आज वाहने सोडून पायी प्रवास करण्याची वेळ –
आज या महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरासाठी एक ते दीड तास लागत होता. या महामार्गावर अनेक नामांकित खासगी शाळा आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज वाहने सोडून पायी प्रवास करण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत होता. येथील ग्रामस्थांनाही या कोंडीचा मोठा फटका बसला.